नंदुरबार : येथील अश्व बाजाराने मागील सर्व उलाढालीचे उच्चांक मोडले आहेत. तीन कोटी ९७ लाख रुपयांच्या उलाढालीचा टप्पा पार केला आहे. दरम्यान, आणखी काही दिवस घोडे विक्री होणार असून त्यातून होणारी उलाढाल लक्षात घेता चार कोटींचा टप्पा पार पडणार आहे.
सारंगखेडा येथील अश्व बाजार हा जगभर उच्च जातीच्या घोड्यांच्या बाबतीत व उमदे घोडे विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी देशभरातून अश्व व्यापारी यांनी आपले जातिवंत व उमदे घोडे सारंगखेडा येथील घोडे बाजारात विक्रीसाठी आणले आहेत. परिणामी, अश्वपारखी व अश्व शौकीनदेखील भारताच्या विविध प्रांतातून या ठिकाणी घोडे खरेदी करण्यासाठी येत असतात. तामिळनाडूपासून ओरिसा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा व महाराष्ट्रभरातून या ठिकाणी अश्व पारखी व व अश्वशौकीन घोडे खरेदी करून घेऊन जातात. आजपर्यंत बाजारात २०१२ साली २ हजार ४९ घोड्यांच्या आवकमधून ९७५ घोड्यांची विक्री झाली होती. यातून ३ कोटी ७६ लाख ३९ हजार ३०० रुपयांची उलाढाल झाली होती. ही या अश्व बाजारातील सर्वाधिक उलाढालीची नोंद होती. यावर्षी दोन हजार ७०० घोड्यांची आवक झाली असून ८ जानेवारी रोजी १८ घोड्यांची विक्री झाली आहे. या विक्रीतून ८ लाख ९० हजार रुपयांची उलाढाल झाली आहे. एकूण ८९६ घोड्यांची विक्री झाली असून या विक्रीतून तीन कोटी ८८ लाख २३ हजार १०० रुपयांची एकूण उलाढाल झाली आहे. येथील घोडेबाजाराचा आर्थिक उलाढालीचा सर्व रेकॉर्ड यावर्षी मोडला आहे. अद्यापही अनेक जण घोडे खरेदीसाठी येत आहेत. त्यामुळे उलाढालीचा टप्पा चार कोटी पार जाणार आहे. या माध्यमातून शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीला देखील मोठा महसूल मिळाला आहे.