नंदुरबार : राज्यात अवकाळी पावसामुळे एक लाख ३९ हेक्टरवर नुकसान झाल्याचा अंदाज असून येत्या दोन दिवसात नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात येणार आहेत. विधिमंडळाच्या चालू अधिवेशनातच नुकसान भरपाईची घोषणा मुख्यमंत्री करतील, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी नंदुरबार येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
नुकसानग्रस्त पीक पाहणीसाठी कृषिमंत्री सत्तार बुधवारी नंदुरबार तालुक्यातील आष्टे व ठाणेपाडा परिसरात आले होते. पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित उपस्थित होते. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले, अवकाळी पावसामुळे राज्यात एक लाख ३९ हजार हेक्टरवर नुकसान झाले आहे. नंदुरबार,नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यात कांदा, गहू, बाजरी,पपई, कलिंगडासह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या सहा महिन्यात संकटग्रस्त शेतकऱ्यांना सर्वाधिक १२ हजार कोटींची मदत राज्य शासनाचे दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.