नंदुरबार : सातपुड्यातील दुर्गम भागातील वालंबा येथे होणारा १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह पोलिसांच्या ऑपरेशन अक्षता मोहिमेअंतर्गत रोखण्यात यश आला. मुलीचे व तिच्या पालकांचे समुपदेशन देखील करण्यात आले.
जिल्ह्यात बालविवाहाची गंभीर समस्या आहे. ही बाब लक्षात घेता पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन अक्षता ही मोहीम सुरू केली आहे. सातपुड्यातील अक्कलकुवा तालुक्यातील वालंबा येथे अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी लागलीच अक्षता पथकाला कार्यवाहीच्या सूचना दिल्या.
अक्षता सेलच्या प्रमुख सहा. पोलिस निरीक्षक नयना देवरे व त्यांच्या पथकाने तत्काळ अक्कलकुवा तालुक्यातील वालंबा काठी येथे जाऊन तेथे पोलिस ठाणे स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या अक्षता समितीचे सदस्य यांच्या मदतीने बालविवाह होणाऱ्या अल्पवयीन मुलीची माहिती घेतली.
मुलगी १४ वर्षे २ महिने वयाची होती. तिचा विवाह गुजरात राज्यातील तापी जिल्ह्याच्या देवरुखली गावातील राहणाऱ्या युवकासोबत होणार होता. त्यापूर्वीच अक्षता समितीने अल्पवयीन मुलीचे आई, वडील व इतर नातेवाइकांना होणारी कायदेशीर कारवाईची माहिती दिली व त्यांचे समुपदेशन केले. मोलगी पोलिस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस अल्पवयीन मुलीच्या पालकांना देण्यात आलेली आहे. अल्पवयीन मुलीच्या पालकांना ही बाब पटल्याने त्यांनी मुलीचे वय १८ पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली.