नंदुरबार : आकाशवाणीच्या एफएम रिले केंद्राचे तसेच देशातील विविध ठिकाणच्या ९१ व १०० वॉट ट्रान्समीटरच्या एफएम केंद्रांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले. नंदुरबार येथे झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित, खासदार डॉ. हिना गावित उपस्थित होते.
नंदुरबारातील दूरदर्शन प्रेक्षपण केंद्राच्या इमारतीत हे रिले केंद्र सुरू करण्यात आले आहे. याद्वारे जिल्ह्यातील दुर्गम भागापर्यंत आकाशवाणीच्या एफएम केंद्राचे कार्यक्रम ऐकण्याची सोय झाली आहे. यावेळी आकाशवाणी जळगावचे केंद्र प्रमुख दिलीप म्हसाने, कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर बोबडे, साहित्यिक डॉ. पितांबर सरोदे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, नंदुरबार जिल्हा हा आकांक्षित आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असून, येथे आकाशवाणीचे प्रक्षेपण दुर्गम भागापर्यंत होत नसल्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या योजना व धोरणांची माहिती मिळत नव्हती; आता ती मिळू शकणार आहे.
खासदार डॉ. हिना गावित म्हणाल्या, २०१४ पासून अर्थात खासदार झाले तेव्हापासून नंदुरबार येथे एफएम केंद्र सुरू करण्याची मागणी होती. नंदुरबार येथे आकाशवाणी केंद्र सुरू होण्यासाठी माहिती व प्रसारण विभागाकडे पाठपुरावा करत असताना एक गोष्ट लक्षात आली की, नंदुरबार हा आदिवासी जिल्हा असल्याने येथे एफएम केंद्र सुरू करण्यासाठी खासगी कंपनी इच्छुक नव्हती. त्यामुळे मी शेवटी केंद्र सरकारकडे येथे केंद्र सुरू करण्याबाबत पाठपुरावा केला आणि या पाठपुराव्यास आज यश मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय माहिती आणि प्रसारण तथा युवा कार्य आणि क्रीडामंत्री अनुरागसिंह ठाकूर याने दुर्गम भागाला न्याय दिल्याचे त्यांनी सांगितले.