नंदुरबार : राज्यातील नंदुरबारसह धाराशिव, गडचिरोली, वाशिम या चारही आकांक्षित जिल्ह्याची प्रगती समाधानकारक आहे. केंद्राच्या विविध योजनांच्या माध्यमातून या जिल्ह्यांचा आर्थिक स्तर उंचावत असल्याचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी येथे बोलताना सांगितले. मंत्री कराड यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. धाराशिव, गडचिरोली व वाशिम जिल्हाधिकारी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सहभागी झाले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. कराड यांनी सांगितले.
देशातील ११२ जिल्ह्यांना आकांक्षित जिल्हा म्हणून मान्यता देण्यात आली आहे. त्यात राज्यातील चार जिल्हे आहेत. निती आयोगाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जात आहेत. नंदुरबार जिल्ह्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले, जिल्ह्यात इंटरनेट सुविधा, स्थलांतर, कुपोषण हे मोठे प्रश्न आहेत. बँक शाखांचा देखील प्रश्न आहे. जिल्ह्यात बँकांच्या नवीन १७ शाखा सुरू करण्यात येणार आहे. त्यातील तीन शाखा लवकरच सुरू होणार आहेत. मोबाइल टॉवरसाठी वन विभागाची अडचण आहे, ती सोडविण्यात येईल. बचत गटांना प्राधान्य देण्यात येत आहे. दरडोई उत्पन्न कसे वाढेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक जिल्हा परिषद गट निहाय बचतगट भवन बांधण्यात येणार आहे. स्थलांतर रोखण्यासाठी लघु व मध्यम उद्योगांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.