रमाकांत पाटील -
नंदुरबार : तापीवरील उपसा योजनांबाबत विधी मंडळात अर्थमंत्र्यांनी त्वरित कामे मार्गी लागण्याचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात मात्र निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने यंदाही कामे रखडणार आहेत. यासंदर्भात आता शासनाने ठोस भूमिका घेण्याची गरज आहे.
तापीवरील उपसा योजनांची कामे गेल्या सात वर्षांपासून रखडले आहे. यासंदर्भात शासनाने निधी मंजूर केला असला तरी प्रत्यक्षात सर्वेक्षण न करता व कामांचा खर्चाचा अंदाज न करता निधी मंजूर झाल्याने, शिवाय इतर तांत्रिक अडचणी समोर येत असल्याने निविदांना प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे उपसा योजना सुरू होऊ शकल्या नाही.
पाटबंधारे विभागाने बैठका घेऊन त्यातून काही मार्ग काढला व ११ योजनांच्या निविदा काढल्या. परंतु एक-दोन योजना वगळता इतर योजनांना प्रतिसाद नसल्याने योजना पावसाळ्यापूर्वी सुरू होण्याबाबत साशंकता आहे. त्यामुळे यासंदर्भात शासनाने ठोस भूमिका घेऊन कामांचे योग्य मूल्यांकन करुन त्यासंदर्भात निधी उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे.