रमाकांत पाटीलनंदुरबार : वेळेवर उपचार न मिळाल्याने आधीच अनेक कुपोषित बालकांचा मृत्यू होत असताना, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण सांगून बेड आरक्षित केल्यामुळे कुपोषित बालकांनाही रुग्णालयात बेडसाठी ‘वेटिंग’ असल्याची संतापजनक बाब समाेर आली आहे. मात्र या बेड आरक्षित करण्यामुळे बालकाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे कोरोना काळात सक्षम आरोग्य सेवा म्हणून नंदुरबार जिल्ह्याचा सर्वत्र बोलबाला झाला होता.
विशेष आरोग्य मोहिमेमुळे कुपोषित बालकांची संख्या प्रचंड वाढल्याने पोषण पुनर्वसन केंद्रे फुल्ल झाली आहेत. आतापर्यंत शहादा, तळोदा, धडगाव, अक्कलकुवा या चार तालुक्यांतील ९४ हजार ९२ बालके तपासण्यात आली असून, त्यात अतितीव्र कुपोषित दाेन हजार ४५२, तर मध्यम कुपोषित १२ हजार ७९ बालके आढळून आली आहेत. अर्थात अद्यापही निम्म्या बालकांची तपासणी बाकी असल्याने हा आकडा मोठ्या संख्येने वाढणार आहे.
पोषण केंद्रात जागा नसली तरी, रुग्णांच्या उपचारासाठी असलेल्या जनरल हॉलमधील बेड देऊन कुपोषित बालकांना दाखल करून घेण्याची पालकांची अपेक्षा होती. मात्र संबंधित बेड संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी आरक्षित करण्याच्या प्रशासनाच्या सूचना असल्याने त्या बेडवर कुपोषित बालकांना उपचारासाठी दाखल करता येणार नाही, असे उत्तर संबंधित वैद्यकीय सूत्रांकडून मिळत आहे.
अनेक बालके गंभीरतपासणी सुरू असताना अतितीव्र कुपोषित बालकांमध्ये अनेक बालके गंभीर स्वरूपात आजारी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या बालकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जात आहे. जिल्ह्यात कुपोषित बालकांसाठी स्वतंत्र आरोग्य पोषण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. दोन महिन्यांपूर्वी एकही बालक नसलेली ही केंद्रे आता फुल्ल झाली आहेत.
अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयातील पोषण केंद्रात केवळ १० बेड आहेत. मात्र, तेथे १२ बालकांना दाखल केले आहे. रुग्णालयातील काही बेड कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. गणेश पवार, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, अक्कलकुवा.