नंदुरबार : धनगर समाजाला आदिवासींच्या सवलतींप्रमाणे सवलती मिळतील, आदिवासींच्या वाट्याचा निधी किंवा सवलतींमधून त्या दिल्या जाणार नाहीत असे स्पष्ट असतांना विरोधक निवडणुकीच्या तोंडावर समाजात गैरसमज पसरवीत असल्याचा आरोप आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, आदिवासींवर अन्याय झाल्याचे जेंव्हाही स्पष्ट होईल तेंव्हा आपण व आपली कन्या खासदार डॉ.हिना गावीत राजीनामा देतील असेही त्यांनी स्पष्ट केले.धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती देण्याचे मुख्यमंत्र्यांनी परवा जाहीर केले आहे. या निर्णयाविरोधत भाजपेतर पक्ष आणि विविध आदिवासी संघटना एकवटल्या आहेत. हा निर्णय त्वरीत मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात पक्ष आणि सरकारची भुमिका स्पष्ट करतांना आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी सांगितले, सरकारच्या निर्णयाबाबत विरोधक गैरसमज पसरवीत आहे. धनगरांना ज्या सवलती आहेत त्याच सवलतींमध्ये अधीक व्यापक स्वरूपात सवलती द्यावयाच्या आहेत. आदिवासींच्या योजनांमध्ये वाटेकरी होणे किंवा आदिवासींच्या विकास निधीतून त्या योजना राबविण्याचा उद्देश नाही. त्यांच्या योजनांसाठीचा निधी वेगळा राहणार आहे.धनगर समाजाला सवलती देण्याचा निर्णयासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी खासदार डॉ.हिना गावीत व आपण बोललो होतो. आदिवासींमध्ये कुठल्याही प्रकारे समावेश करू नये, आदिवासींचा निधी दिला जावू नये अशी ठाम भुमिका घेतली होती. तसाच निर्णय आता मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.विरोधकांकडे मुद्दा नसल्यामुळे शासनाच्या या निर्णयाचा आदिवासी समाजात गैरसमज पसरवून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहे. यापूर्वी याच पक्षांनी धनगरांना आदिवासी समाजात समाविष्ट करावे म्हणून मागणी केलेली आहे.आता तेच शाळसूद पणाचा आव आणत असल्याचा टोला देखील आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी लगावला. यावेळी भाजपचे नेते डॉ.कांतिलाल टाटीया, प्रकाश चौधरी, मोहन खानवाणी, चारूदत्त कळवणकर आदी उपस्थित होते.
धनगर समाजाला आदिवासींमधून सवलती नाहीच : विजयकुमार गावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 11:52 AM