रमाकांत पाटीललोकमत न्यूज नेटवर्कराज्यात आणि देशात सध्या ज्या बर्ड फ्लूची चर्चा आहे. तो व्हायरस अतिशय सौम्य आहे. त्याचे नाव एच ५ एन ८ असे असून, या व्हायरसने केवळ ५०० ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी वजनाचे पक्षी अर्थात कावळे व काही स्थलांतरीत पक्षांना धोका आहे. कोंबड्यांना कुठलाही धोका नसून, कोंबड्या पूर्णपणे सुरक्षित आहेत. याबाबत जनमानसात जनजागृती झाली पाहिजे. केवळ अफवांमुळे पोल्ट्री व्यवसायावर धोका निर्माण झाला आहे. सध्या बर्ड फ्लूमुळे जे कावळे व स्थलांतरीत पक्षी मृत होण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यादेखील थांबल्याने कुणालाही काळजी करायची गरज नाही. याबाबत जनतेत वस्तुस्थिती समजावून जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष आरीफ बलेसरिया यांनी ‘लाेकमत’शी बोलताना केले.
सध्याच्या बर्ड फ्लूबाबत तुमची भूमिका काय?देशातील काही भागात व राज्यातीलही काही भागात कावळे व स्थलांतरीत लहान पक्षी मृत झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यातून बर्ड फ्लूची चर्चा सुरु झाली आहे. मुळातच हा व्हायरस २००६ सारखा नाही. २००६ ला एच ५ एन १ हा व्हायरस होता. तो अतिशय घातक होता. नवापूरमध्ये त्यामुळे रोजच्या सुमारे दोन ते पाच हजार कोंबड्या मृत होत असल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे तो प्रसंग खरोखरच हृदयद्रावक होता. आत्तामात्र तसे प्रसंग नाही. या वेळी ज्या ठिकाणी पक्षी मृत झाले त्याच्या तपासणीतून एच ५ एन ८ हा व्हायरस असल्याचे निदर्शनास आले. हा अतिशय सौम्य असून, त्यामुळे केवळ हलके पक्षी मृत झाल्याचे निदर्शनास आले. त्याचे प्रमाणही अतिशय नगण्य आहे. कोंबड्यांचे वजन हे एक किलो किंवा त्यापेक्षा अधिक असल्याने या व्हायरसचा कोंबड्यांना कुठलाही धोका नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.
व्यवसायावर गंडांतर... २००६ मध्ये आलेल्या बर्ड फ्लूमुळे नवापूरमधील व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे त्या काळी ६० पेक्षा अधिक पोल्ट्री फार्म होते. आता केवळ १२ ते १३ पोल्ट्री व्यावसायिक असून, त्यात जवळपास २० लाख पक्षी आहेत. कोरोनामुळे तब्बल आठ महिने पोल्ट्री व्यवसायात प्रचंड मंदी आली होती. त्यामुळे बाॅयलर चिकन २० रुपये किलो प्रमाणेही कुणी घ्यायला तयार नव्हते तर अंडीचे दर दोन रूपयांपेक्षा खाली घसरले होते. या कठिण प्रसंगानंतर दोन महिन्यापासून व्यवसाय रूळावर येत असताना बर्ड फ्लूच्या चर्चेने पुन्हा घात केला आहे. वास्तविक सध्या २००६ सारखी स्थिती नाही. नंदुरबार जिल्ह्यात कुठेही पक्षी मृत झाल्याचे वृत्त नाही. चिकन शिजवून खाल्ल्यास कुठलाही धोका नाही, असे तज्ज्ञ सांगतात. नवापूर व नंदुरबार जिल्ह्यातील व्यावसायिक केवळ अंडी विक्रीचा व्यवसाय करीत असून, रोज २० लाखांपेक्षा अधिक अंडी विक्री केली जात असल्याचे आरिफ बलेसरिया यांनी सांगितले.