ऑनलाईन लोकमत
मालपूर,जि.धुळे,दि. - शिंदखेडा तालुक्यातील सुराय येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. 28 एप्रिल रोजी झालेल्या अक्षय्यतृतीया सणानंतर आजर्पयत सुराय गावातील नळांना पाणीच आलेले नाही. गावातील लहान मुले, महिला व नागरिकांना रानावनात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परिसरातील सुराय येथे ग्रुप ग्रामपंचायत आहे. त्याअंतर्गत चुडाणे, अक्कलकोस, कलवाडे आदी गावांचा समावेश आहे. चुडाणे आणि कलवाडे येथेसुद्धा पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे; तर चुडाणे येथे टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सुराय गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी अक्कलकोस, चुडाणे, कलवाडे व सुराय येथे प्रत्येकी एक विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे. मात्र, त्या विहिरींनी तळ गाठल्यामुळे पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अक्कलकोस गावातील विहिरीला थोडे पाणी आहे. मात्र, तेवढे पाणी अक्कलकोससाठीच पुरेसे होत नाही. तसेच सुराय गावाला या विहिरीतून पाणीपुरवठा होऊ शकत नाही. कलवाडे व चुडाणे येथील विहिरींमध्येही पाण्याचा ठणठणाट आहे.
दोंडाईचा, मालपूर येथून आणावे लागते पाणी
सुराय येथील काही ग्रामस्थ दररोज दोंडाईचा किंवा मालपूर येथे जाऊन पाण्याचे ड्रम गाडय़ांवरून भरून आणतात. तर काही ग्रामस्थ खासगी टॅँकर बोलावून पाणी मागवताना दिसतात.