लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापूर व धडगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. नवापूर तालुक्यातील सरपणी नदीचे पाणी घरांमध्ये घुसल्याने विसरवाडी येथे 25 पेक्षा अधीक जनावरे वाहून गेली तर एका महिलेचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त होत आहे. नवापूरातील एक फरशीपूल वाहून गेला. धुळे-सुरत महामार्गावर कोंडाईबारी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 11 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटे नवापूर व धडगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. नवापूर तालुक्यात 140 तर धडगाव तालुक्यात 104 मि.मी.पाऊस नोंदला गेला. नवापूर व गुजरातमधील डांग जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे रंगावली, सरपणी नद्यांना पूर आला. यामुळे विसरवाडी येथील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांना सुरक्षीत स्थळी हलविले. या पुरात बालाहाट येथील एक महिला वाहून गेल्याची भिती आहे तर विसरवाडी व परिसरात 25 पेक्षा अधीक पाळीव जनावरे दगावली आहे. नवापुरातील पूल पाण्याखाली गेला आहे.धुळे-सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. चरणमाळ व नंदुरबारमार्गे ही वाहतूक वळविण्यात आली आहे. धडगाव तालुक्यात देखील अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याची माहिती आहे.नवापूर येथे रंगावली नदीला मोठा पुर आल्याने पुरामध्ये 2 व्यक्ती अडकलेल्या होत्या त्यांना प्रशासनाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले. काही सखल भागामध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेल्याने नुकसान झाले आहे. सर्व नुकसानग्रस्त भागांमध्ये पंचनाम्याचे काम तातडीने सुरु करण्यात आले आहे.जिल्हाधिका:यांनी दिलेल्या माहितीनुसार, रंगावली नदीला आलेल्या पुरामुळे तसेच कोंडाईबारी घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतुक विस्कळीत झाली असून वाहतुक सुरळीत करण्याबाबत प्रशासनाकडून प्रय} सुरु आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने कार्यकारी अभियंता बांधकाम, जलसंपदा, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, उपायुक्त पशुसंवर्धन व इतर सर्व संबंधितांना तातडीने समस्या सोडविण्याबाबत निर्देशित केले आहे. या संपूर्ण घटनेवर स्वत: जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी लक्ष ठेवून आहेत.
नवापूर तालुक्यात पावसाचा हाहाकार, एकजण वाहून गेल्याची भिती, अनेक जणावरे दगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:00 PM