बसस्थानक परिसर
बसस्थानक परिसरात बाहेरगावाहून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिंना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. बसस्थानकाच्या परिसरात टारगट युवक दिवसभर चकरा मारत असतात. बसस्थानकात देखील विद्यार्थीनींचा घोळका असलेल्या ठिकाणी शेरेबाजीला ऊत येतो.
दिनदयाल चौक-डी.आर.विद्यालय
दिनदयाल चौक व डी.आर.विद्यालय परिसरात सकाळी व दुपारी टारगट युवकांच्या फेऱ्या वाढलेल्या असतात. दुचाकीवरील मुलींना कट मारणे, शेरेबाजी करणे, आक्षेपार्ह हावभाव करणे असे प्रकार येथे सर्रास पहावयास मिळतात. याच ठिकाणी बसथांबा देखील असल्याने तेथून खेड्यावरील विद्यार्थीनी रवाना होतात त्यांनाही अशा टारगटांचा सामना करावा लागत असतो.
कॉलेज रोड
कॉलेजरोडवर तर नेहमीच हे प्रकार आढळतात. या भागात युवकांचे दोन ते तीन गट आहेत. त्यांच्यातच अनेक वेळा हाणामारी देखील झाली आहे. त्यामुळे या भागात एखाद्या वेळी कायदा व सुव्यवस्था देखील धोक्यात येऊ शकते. या भागात आयटीआय, जीटीपी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, विविध शाखांचे महाविद्यालये आहेत. त्यामुळे टारगटांचा भरणा येथे सर्वाधिक दिसून येतो.
कोणी छेड काढत असेल तर संपर्क करा...
कुणी छेड काढण्याचा प्रयत्न करीत असेल तर पोलीस कंट्रोल रूम किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करावा. दामिनी पथकांचे यापूर्वी दिलेले नंबर मात्र बंद आहेत. त्यामुळे नवीन नंबर अर्थात हेल्पलाईन नंबर द्यावा व त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन करावे अशी मागणी होत आहे. याशिवाय मोबाईलमध्ये सुरक्षेसंदर्भात अनेक अॅप आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील संपर्क साधता येत असतो.
दामिनी पथक दिसेनासे...
गेल्या काही दिवसांपासून मात्र दामिनी पथकच दिसत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थीनी, पालक तसेच शाळांनीही केल्या आहेत. पूर्वी शाळा सुरू होणे, मधली सुट्टी व शाळा सुटण्याच्या वेळी पथकाचे वाहन गस्त घालत असतांना दिसत होते. आता मात्र अभावानेच ते दिसते. त्यामुळे टारगट युवकांचे फावले आहे.
कारवाई झाल्या कमी
छेड काढणाऱ्या युवकांवर कारवाईचे प्रमाण कमी झाले आहे. दामिनी पथकासोबतच शहर व उपनगर पोलिसांचे गस्ती पथक देखील अशा कारवाया करण्यास उदासिन असल्याचे दिसून येत आहे.
शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी अनेक दिवसांपासूनची आहे. काही शाळांनी आपल्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत कॅमेरे लावले आहेत. परंतु त्यांची चित्रकरणाची क्षमता त्याच भागापुरती आहे. त्यामुळे मुख्य चौक व छेडखानी होणाऱ्या भागात पालिका किंवा पोलीस दलाने सीसीटीव्ही कॅमेरे लावावे अशी मागणी होत आहे.