लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात गेल्या १० दिवसात कोसळलेल्या पावसामुळे शेतीपिके हातची गेली आहेत़ यामुळे शेतात पाणी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अशी स्थिती आहे़ शेतातील पाणी काढण्यास जागा नसल्याने शेतकरी हतबल झाल्याचे चित्र असून पिके हातून गेल्याने अनेकांनी शेतात नांगर फिरवत रब्बी हंगामाच्या तयारीची वाटचाल सुरू केली आहे़जिल्ह्यात संथ सुरूवात करणाºया पावसाने जुलै ते आॅगस्ट दरम्यान मुसळधार हजेरी लावली आहे़ परिणामी सुस्थितीत असलेली पिके नुकसानीच्या गर्तेत सापडली आहेत़ आॅगस्ट महिन्यात २७ हजार शेतकरी आधीच बाधित झाले होते़ यात पुन्हा सप्टेंबर महिन्यात सलग १० दिवस कोसळलेल्या पावसात उरली सुरली पिकेही हातची गेली असून सर्व तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे़ या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात पंचनामे अद्यापही पूर्णपणे सुरू झालेले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे़ गेल्या वर्षीची अतीवृष्टी, मार्चपासून थैमान घालणारा कोरोना आणि आता पुन्हा संततधारेने झालेले नुकसान यामुळे शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे़ यामुळे शेतकºयांवर कर्जाचा डोंगर वाढणार आहे़ ‘लोकमत’ने जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यात नुकसानीचा आढावा घेत पाहणी केली असता, चार दिवस उलटूनही शेतात पाणी साठून असल्याने पिकांवर मर आल्याचे दिसून आले़ धान्यपिके, कापूस, फळ पिके आणि तेलबिया पिके पाण्यात असल्याने सडू लागली आहेत़ यातून शेतातील चांगली पिकेही रोगराईच्या जाळ्यात अडकत असल्याचे चित्र दिसून येत आहे़
जिल्ह्यात यंदा २ लाख ९५ हजार २१९ हेक्टर क्षेत्रात खरीप पेरण्या झाल्या आहेत़ यात यात नंदुरबार ६७ हजार ८ हेक्टर, नवापूर ५५ हजार १७३, शहादा ७४ हजार ८६८, तळोदा २३ हजार ७४७, धडगाव १७ हजार ७२३ तर अक्कलकुवा तालुक्यात ३९ हजार ९८१ हेक्टरवर पिकांची पेरणी झाली आहे़