मोहिदा त.ह. येथील घटना :- शहादा पोलिसात गुन्हा दाखल
ब्राह्मणपुरी : शहादा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या मोहिदा त.ह. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून टीव्ही संचासाठी वापरात येणाऱ्या बॅटरीसह इतर साहित्य चोरीस गेल्याची घटना सोमवारी सकाळी उघडीस आली असून, याबाबत शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, शहादा तालुक्यातील मोहिदा त.ह. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान व्हावे, याकरिता टीव्ही संच बसविण्यात आले होते. यासाठी बॅटरीदेखील बसविण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे बालकांसह पालकही अनेक दिवसांपासून शाळेकडे फिरकलेले नसल्याने अज्ञात चोरट्याने रविवारी रात्रीच्या सुमारास आसपास कुणीही नसल्याची संधी साधून शाळेच्या खोलीचे कुलूप तोडून टीव्ही संचासाठी वापरात असलेली बॅटरी, इन्व्हर्टर, दोन स्पीकर, शैक्षणिक साहित्य ठेवण्याच्या दहा पेट्या, रिमोट, वायरलेस माइक, हेडफोन, नेट बॉक्स असा सुमारे ३३ हजारांचा मुद्देमाल अज्ञान चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी शाळेच्या शिक्षकांच्या निदर्शनात आल्यावर मुख्याध्यापकांच्या तक्रारीवरून शहादा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. शाळेतून शैक्षणिक साहित्य चोरीला गेल्याने गावात चर्चेला उधाण आले आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी टीव्ही संच व बॅटरी, इन्व्हर्टर आदींची खरेदी करण्यात आली होती. जिल्हा परिषद शाळेत चोरी झाल्याने आता परिसरातील इतर शाळांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या चोरट्यांवर आळा घालण्यासाठी परिसरात रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.