नंदुरबार : शहरातील पटेलवाडीत राहणाऱ्या वनकर्मचाऱ्याच्या घरात चोरीची घटना घडली आहे. १८ मार्च रोजी सकाळी हा प्रकार समोर आला. या चोरीत रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने आणि कर्मचाऱ्याने घरात संग्रह म्हणून साठवून ठेवलेले साैदी अरेबियन चलनही चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. वन विभागाचे कर्मचारी साजिदअली युनूसअली यांच्या पटेलवाडी येथील प्लॅाट क्रमांक २९९ मध्ये ही चोरी झाली. १८ मार्च पासून वनकर्मचारी साजिद अली हे शहादा येथे गेले होते. यामुळे त्यांचे घर बंद होते.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी त्यांचा भाचा उवेश हा जेवणासाठी त्याच भागात गेला असता, साजिद अली यांच्या घराला कुलूपाऐवजी कडी लावलेली दिसली. त्याने तातडीने ही बाब साजिद अली यांना कळवल्यावर ते नंदुरबार येथे आले होते. घरात प्रवेश करून तपासणी केली असता, आतील कपाट फोडून चोरट्यांनी २० हजार रुपये राेख आणि १ लाख ५४ हजार रुपये किमतीची सोन्या-चांदीची नाणी तसेच हाैस म्हणून संकलित केलेल्या ३०० रुपयांच्या साैदी अरेबियन नोटा चोरीला गेल्याचे दिसून आले. याप्रकरणी साजिदअली यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करत आहेत.