लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : चोरट्यांनी दारू चोरण्यासाठी बीअरबार, दारू दुकाने फोडल्यानंतर आता आपला मोर्चा थेट राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गोदामाकडे वळविला. या ठिकाणी चोरट्यांना दारू साठ्याचे मोठे घबाड सापडले. तब्बल पाच लाख १३ हजार ४४० रुपयांची विदेशी दारू लंपास केली. विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर पोलीस अधीक्षक कार्यालय, सर्व शासकीय कार्यालये असतांना ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केलेली अवैध वाहतुकीची, बनावट दारू ठेवण्यासाठी आरटीओ कार्यालयाच्या अर्थात जुन्या दूधडेअरी आवारातील गोदाम भाड्याने घेतले आहे. या गोदामात लाखो रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करून ठेवण्यात आलेला आहे. गोदामाच्या छतावरील सिमेंटचे पत्रे उचकवून चोरट्यांनी ही संधी साधली. २८ मार्च ते १४ एप्रिल दरम्यान ही चोरी झाल्याची शक्यता आहे. चोरट्यांनी ५ लाख १३ हजार ४४० रुपये किंमतीच्या विदेशी दारूच्या तब्बल ७ हजार ५८९ बाटल्या लांबविल्या.उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी नियमित तपासणीसाठी गेले असता त्यांना त्या ठिकाणी चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनंतर १७ एप्रिल रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सुभाष बाविस्कर यांनी फिर्याद दिली. तपास फौजदार पी.पी.सोनवणे करीत आहे.या घटनेमुळे मात्र एकच खळबळ उडाली आहे. पोलीस मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर शासनाने जप्त केलेला मुद्देमाल सुरक्षीत राहू शकत नाही तर सर्वसामान्यांचे काय? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
चोरट्यांनी एक्साईजचेच दारू गोदाम फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 12:42 PM