n लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एक हजारातून केवळ ३० व्यक्ती कोरोना पॅाझिटिव्ह आले आहेत. येथील आरटीपीसीआर लॅबमधून २४ तासात तब्बल एक हजार स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्याची टक्केवारी अवघी तीन टक्के इतकी आहे. त्यात सर्वाधिक शिक्षकांचा समावेश आहे. नववी ते बारावीपर्यंत शिकविणा-या सर्वच शिक्षकांची कोरोना तपासणी पुर्ण झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. नववी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. या वर्गांना शिकविणा-या सर्वच शिक्षकांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या शिक्षकांची संख्या तब्बल चार हजार १४१ इतकी होती. याशिवाय शिक्षकेतर कर्मचारींची संख्या एक हजार १५८ इतकी आहे. त्या सर्वांची कोरोना चाचणी शुक्रवारी पुर्ण करण्यात आली. एक हजार अहवालजिल्ह्यातील एक हजार जणांची स्वॅब तपासणी दोन दिवसात करण्यात आली. त्याचा एकत्रीत अहवाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. पहिल्या टप्प्यात ९७७ जणांचे कोरोना चाचणी अहवाल जाहीर करण्यात आले. त्यात २९ जण पॅाझिटिव्ह आले. त्यातील नंदुरबार तालुक्यात पाच, नवापूर तालुक्यात दोन, अक्कलकुवा तालुक्यात आठ, तळोदा तालुक्यात दोन, शहादा तालुक्यात ११ जिल्हाबाहेरील एक अशा २९ जणांचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील १८ जणांचे अहवाल जाहीर करण्यात आले. त्यातील एकाचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. शिक्षक व्यतिरिक्त इतरांची स्वॅब तपासणी मंदावलीगेल्या आठ दिवसांपासून शिक्षकांची स्वॅब तपासणी करण्यात येत असल्यामुळे अनेक स्वॅब संकलन केंद्रात त्यांच्याच रांगा दिसून येत होत्या. त्यामुळे इतर सामान्य लोकांची स्वॅब तपासणीच जिल्ह्यात मंदावली आहे. परिणामी कोरोना पॅाझिटिव्हचा आकडा देखील कमी येत होता. वास्तविक दिवाळीच्या काळात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक बाहेर पडले. प्रवास मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळे या काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु स्वॅब संकलन आणि तपासणीच झाली नसल्याने कोरोना पॅाझिटव्ह पुढे आले नाहीत.संक्रमण वाढण्याचा धोकागुजरातमधील वाढता प्रादुर्भाव, सिमेवर न होणारी तपासणी, नागरिकांची सर्रास ये-जा यामुळे जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा धोका वाढला आहे. त्यातच सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. परिणामी विविध आजारांचे रुग्ण वाढत आहेत. त्यातच कोरोनाचे रुग्ण देखील निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता स्वॅब संकलन मोठ्या संख्येने होणे आवश्यक आहे. तसे झाले नाही तर जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही असा धोका यापूर्वीच वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
२४ तासात झाल्या कोरोनाच्या हजार चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 12:36 PM