लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील पंचशील कॉलनीत चोरांनी धुमाकूळ घालून तीन धाडसी घरफोडी केल्या. नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरटय़ांच्या हाती किरकोळ रक्कम व वस्तूंशिवाय काहीच लागले नाही. याबाबत शहादा पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे पंचशील कॉलनीत धनत्रयोदशीच्या दिवशी रात्रीच्या सुमारास पाच ते आठ जणांनी बंद घराची कुलपे तोडून व आजूबाजूच्या घरमालकांच्या घराच्या कडीकोयंडा लावून धाडसी चोरी केली. चोरांचा मागोवा आजूबाजूच्या घरमालकांना लागल्याने मोबाईल संपर्काने एकमेकांशी संपर्क साधून चोरटय़ांना पळवून लावले. चोरटय़ांनी सुमारे अर्धा तास धुमाकूळ घातला होता. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेबाबत पोलिसांना पाचारण करून घटनेची इत्यंभूत माहिती दिली. पोलिसांनी तिन्ही घरांची तपासणी करून ठसे तज्ञ व श्वानपथक यांना पाचारण करून घटनेचा मागोवा घेतला. मात्र तज्ञांच्या पथकाला हाती काहीच लागले नाही. त्यांना खाली हात परत जावे लागले. ही घरफोडी केंद्रप्रमुख नरेंद्र महिरे यांचे भाडेकरू ग्रामसेवक प्रवीण खाडे हे दिवाळीच्या सुटीनिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यांच्या घराला लागून असलेले पीतांबर बैसाणे व सुबोध बैसाणे यांच्या घराचे कडीकोंयडा व कुलपे लावल्याचे दिसल्याने चोरटय़ांनी तिन्ही घरांवर डल्ला मारला. मात्र त्यांना हाती काहीच लागले नाही. किरकोळ रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. याबाबत शहादा पोलिसात घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
एकाच वसाहतीत तीन घरे फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:19 PM