लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : वशहरातील रिलायन्स पेट्रोल पंपानजीक धुळे-सुरत महामार्गाच्या वळणावर दोन वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला. या अपघातात तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.प्रत्यक्षादर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जीप (क्रमांक एम.एच.१८ बीसी ५१५८) धुळ्याकडून सुरतकडे जात असताना नवापूर शहरातील कार (क्रमांक एम.एच.१८ डीएम ८४९) जुन्या आरटीओकडे रिलायन्स पेट्रोल पंपाकडे येत असताना जीप व कारची जोरदार धडक झाल्याने अपघात झाला. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. जीपमध्ये एकूण आठ-दहा प्रवाशी होते. ते साक्री तालुक्यातील आयने येथून उत्तरकार्याचा कार्यक्रम आटोपून सुरत येथे जात होते. यात महिलांची संख्याही मोठी होती. नवापूर शहरातील कारमध्ये दोन प्रवाशी होते. कारमधील चालकाच्या हाताला दुखापत झाली आहे तर जीपमधील दोन-तीन प्रवाशांना हातापायाला व डोक्याला मार लागला आहे. दोन्ही वाहनातील दोन-तीन प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. ते खाजगी रुग्णालयात उपचार करून रवाना झाले आहेत. दोन्ही वाहन चालकांना नवापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याठिकाणी नातेवाईकांनीही गर्दी केली. सुदैवाने अपघातात जीवितहानी झाली नाही. गंभीर दुखापतही झाली नाही. धुळे-सुरत महामार्गावरील धोकेदायक वळणामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महामार्गाचे चौपदरीकरण करताना महामार्गावरील धोकेदायक वळण, खोल गेलेल्या साईडपट्ट्या, नादुरुस्त रस्ते, कठडे नसलेले पूल यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. संबंधित प्रशासनाने योग्य ती कारवाई करून उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
नवापुरात जीप व कार अपघातात तीन जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2020 12:18 PM