लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : होळ तर्फे हवेली शिवारात बंद घर फोडून तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची घटना शनिवारी सकाळी 7 वाजता उघडकीस आली़ घटनेमुळे खळबळ उडाली आह़े होळ तर्फे हवेली शिवारातील शनिछाया नगरात राहणारे दंगल शेवाळे हे मुलीला भेटण्यासाठी नाशिक येथे गेले असल्याने घराला कुलूप होत़े या गोष्टीचा फायदा घेत शनिवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या घराच्या बंद दरवाजाचे कुलूप तोडून चोरटय़ांनी आत प्रवेश केला़ घरातील कपाट फोडून आतील 2 लाख 98 हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज चोरुन पळ काढला़ सकाळी परिसरातील नागरिकांना घराचे कुलूप तुटले असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी शेवाळे यांचा मुलगा चेतन यांना माहिती दिली़ त्यांनी तातडीने घरी भेट दिल्यानंतर दागिने व रक्कम चोरीला गेल्याचे स्पष्ट झाल़े याबाबत चेतन शेवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटय़ांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होत़े श्वानाने होळ शिवार व पातोंडा रस्त्याकडे माग काढल्याची माहिती देण्यात आली आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक योगिता पाटील करत आहेत़ चोरीमुळे परिसरात घबराट पसरली आह़े
लेकीला भेटण्यासाठी गेलेल्या वृद्धाचे बंद घर फोडून तीन लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 12:06 PM