लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मद्य विक्रीचे दुकान फोडून सव्वातीन लाख रुपये चोरणा:या दोघांना 24 तासाच्या आत पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून रक्कम हस्तगत केली आहे. दोन्ही चोरटे नंदुरबारातीलच आहेत. त्यांच्याकडून इतरही चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.जयेश भिकाजी गायकवाड (24) रा.संभाजीनगर व भावेश उर्फ भैय्या संजय पाटील (20) रा.हुडको कॉलनी नंदुरबार यांना अटक करण्यात आली आहे. नंदुरबारातील गिरिविहार गेटसमोरील मोरे वाईन्स या दुकानाचे शटर तोडून चोरटय़ांनी 18 रोजी रात्री तीन लाख 18 हजार 685 रुपये चोरून नेले होते. या घटनेच्या दोन दिवस आधीच जवळच असलेल्या जैन मंदीरातून देखील चोरटय़ांनी दानपेटी लांबविली होती. त्यातही 90 हजार रुपये चोरीस गेले होते. त्यामुळे उपनगर पोलीसांवर तपासाचे मोठे आव्हान होते. उपनगर पोलीस ठाण्याचे निरिक्षक संदीप रणदिवे यांनी गुप्त माहितीगारांकडू माहिती काढून संशयीतांवर पाळत ठेवली. त्यानुसार जयेश भिकाजी गायकवाड व भैय्या संजय पाटील हे हुडको कॉलनीत संशयीतरित्या फिरत होते. त्यांना पथकातील कर्मचा:यांनी ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणल्यावर त्यांची चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. मोरे वाईन्स शॉपच्या शटरचे कुलूप तोडून गल्ल्यातील तीन लाख 18 हजार 685 रुपये चोरल्याचे त्यांनी सांगितले. त्यातील काही रक्कम त्यांनी पोलिसांना काढून दिली. या दोघांकडून शहरासह परिसरातील चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक प्रशांत वाघुंडे, उपअधीक्षक रमेश पवार, पोलीस निरीक्षक किशोर सोन्याबापू नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, सहायक निरीक्षक सुनील बच्छाव, हवालदार रवींद्र शिरसाठ, केशव गावीत, भूषण बागुल, कपील बोरसे, दिनेश वसुले, अतुल गावीत, जगदीश पाटील, अरुण सूर्यवंशी, निलेश व्यवहारे, नितीन भालेराव यांनी केली.
सव्वा तीन लाखांची चोरी लागलीच उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:05 PM