लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील वाळू घाट लिलावांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. शहादा तालुक्यातील तीन वाळू घाट लिलाव होणार आहे. तिन्ही घाट हे तापीनदीतील आहेत.महसूली उत्पन्न वाढविण्याचे निर्देश विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले होते. त्यासाठी जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलाव करण्याच्या सुचनाही त्यांनी गेल्या महिन्यात नंदुरबारातील आढावा बैठकीत दिल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने वाळू घाट लिलावा संदर्भात प्रक्रियेला सुरुवात केली होती. जिल्ह्यात तापी, गोमाई, रंगावली या नदींमध्ये एकुण ३१ वाळू घाट आहेत. त्यातील अनेक घाट हे पर्यावरण मुल्यांकनात अडकले होते. शिवाय स्थानिक गावकरींचा विरोध देखील राहत होता. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून दोन ते सहा वाळू घाटांचेच लिलाव होत आहेत. तिन्ही शहादा तालुक्यातीलसद्यस्थितीत वाळू घाटासाठी काढण्यात आलेल्या निविदा या शहादा तालुक्यातील तीन वाळू घाटांच्या आहेत. तापीनदीवरील कुढावद तर्फे सारंगखेडा, कौठळ व टेंभा या गाव शिवारातील वाळू घाटांचा समावेश आहे. नंदुरबार तालुक्यातील एकही वाळू घाटाचा समावेश नाही. लिलाव होणाऱ्या वाळू घाटांसाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांनी निर्गमीत केलेले आदेश, राज्यस्तरीय पर्यावरण तज्ज्ञ मुल्यांकन समिती, पर्यावरण आघात मुल्यांकन प्राधिकरण यांच्या शर्ती व अटींच्या अधीन राहूनच वाळू घाट लिलाव करण्यात येणार आहेत. तापीच्या वाळूला मोठी मागणी आहे. त्यामुळे या वाळूला सोन्याचा भाव मिळतो. थेट नाशिक, मुंबई, औरंगाबाद या भागात ही वाळू जाते. सद्या जिल्ह्यात वाळू घाट व वाळू उपसा नसला तरी दररोज ५० ते ६० वाहने जिल्हाबाहेर वाळू घेऊन जातात. गुजरातमधील वाळू घाटावरून ही वाळू उचलली जात असल्याचा दावा केला जात असला तरी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर अवैध उपसा होत असल्याचा आरोप केला जातो. याबाबत वेळोवेळी झालेल्या कारवाया देखील त्याला दुजोरा देतात.
जिल्ह्यातील तापी नदीतील तीन वाळू घाटचा होणार लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 12:36 PM