लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये गोरगरीबांचे हाल होवू नयेत यासाठी उज्जवला गॅस योजनेंतर्गत लाभार्थींना तीन महिने मोफत गॅस सिलींडर देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे़ यांतर्गत जिल्ह्यातील १७ एजन्सीधारक टप्प्याटप्प्याने पुरवठा करत असून सोमवारपासून वाटप अधिक वेगाने सुरु होणार आहे़ तूर्तास नागरिकांना नियमितपणे दर दिवशी तीन हजार सिलींडर पोहोचत आहेत़नंदुरबार येथे पाच, नवापुर येथे दोन, शहादा पाच, तळोदा १, अक्ककुवा तालुक्यात ३ तर धडगाव येथे १ अशा एकूण १७ एजन्सींद्वारे जिल्ह्यात घरगुती स्वयंपाकासाठी लागणारे गॅस सिलींडर वाटप करण्यात येतात़ शनिवारअखेरीस सर्व १७ एजन्सींकडे १७ हजार १२१ सिलींडर असल्याची माहिती देण्यात आली आहे़ या एजन्सींकडून एकूण २ लाख २५ हजार नियमित घरगुती कनेक्शन आहेत़ तर गेल्या काही वर्षात ग्रामीण भागातील महिलांकडून उज्ज्वला योजनेंतर्गत नोंदण्या करण्यात आल्या आहेत़ याची संख्या ही ८५ हजारांच्या घरात आहे़ हे सर्व कनेक्शन अॅक्टीव्हेट करण्यात आले आहेत़ वाटपानंतर बऱ्याच जणांनी गॅस सिलींडरचा वापर सुरु केला होता़ यातून या योजनेचे जिल्ह्यातील महत्त्व वाढले आहे़ उज्ज्वला योजनेच्या सिलींडरचा पुरवठा कंपन्यांकडून टप्प्याटप्प्याने होण्याची माहिती आहे़ यानुसार सर्वच एजन्सीने तीन महिन्यांसाठीच्या सिलींडरच्या नोंदण्या ह्या गेल्या आठवड्यापासून सुरु केल्या आहेत़ यात मोबाईल क्रमांकावर ओटीपी देण्यासह विविध कामांना सुरुवात झाली आहे़ यातून नोंदणी झालेल्या ग्राहकांना घरपोच सिलींडर देण्यावर भर देण्यात येत आहे़ येत्या आठवड्यात जास्तीत जास्त लाभार्थींपर्यंत हे सिलींडर पोहोचणार आहे़दरम्यान दुसरीकडे लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळातही नियमित ग्राहकांना घरपोच सिलींडर देणे वेगात सुरु आहे़ शनिवारअखेरीस सर्व १७ एजन्सींमध्ये ७ हजार १२१ सिलींडरचा साठा उपलब्ध होता़ यातून तीन हजार २९४ ग्राहकांपर्यंत सिलींडर पोहोचते करण्यात आले होते़ सरासरी दर दिवशी तीन हजार ग्राहकांना सिलींडर पोहोचते करण्यावर भर दिला जात असून जिल्हा पुरवठा विभाग नियमित कनेक्शनसह उज्ज्वला योजनेच्या वाटपावर लक्ष ठेवून आहे़उज्ज्वला गॅस योजनेचे सर्वाधिक कनेक्शन्स हे ग्रामीण भागात असल्याने एजन्सीधारकांकडून योग्य त्या प्रकारे नियोजन करण्यात आले आहे़ नोंदणीसाठी गर्दी होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्सिंग करुन ग्रामीण भागात नोंदण्या करुन कार्ड अपडेट करुन देण्यात आले आहेत़ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कनेक्शन असल्याने पुरवठा करण्यात अडचणी येणार नाहीत यासाठी पुरवठा कंपन्यांकडून दक्षता घेण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे़
जिल्ह्यातील १७ एजन्सींकडून दर दिवशी पोहोचवले जाताहेत तीन हजार सिलींडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 12:46 PM