नंदुरबार : बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन महिलेची सव्वा लाखाची पोत लंपास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच महिलांपैकी तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले. गर्दी करून बसमध्ये चढताना महिलांच्या गळ्यातील पोत, पर्स किंवा पुरुषांचे पाकीट मारण्याची पद्धत या महिलांची असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुनीता दादाभाई राखुंडे, सरजू शशीभाई कासुदे, सपना विरू हातागडे, रा.मोहाडी, धुळे असे ताब्यात घेतलेल्या महिलांची नावे आहेत, तर दोन महिला तेथून पसार झाल्या. पोलीस सूत्रांनुसार, उषाबाई पितांबर जाधव, रा.पाटण, ता. शिंदखेडा या व्यापाराहून शिरपूरकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी या महिलांनी त्यांच्या भोवती गर्दी करून त्यांच्या गळ्यातील एक लाख ३५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरी केली. महिलेच्या लक्षात आल्यावर त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर या महिलांना ताब्यात घेण्यात आले. याबाबत उषाबाई जाधव यांनी फिर्याद दिल्याने महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक निरीक्षक दिगंबर शिंपी करीत आहेत.
दरम्यान, या महिलांची चोरी करण्याची पद्धत ही गर्दी करून चोरी करण्याची आहे. बसमध्ये चढताना एखाद्या महिलेला किंवा पुरुषाला हेरून त्याच्याभोवती गर्दी करायची. बाकीच्या महिलांनी त्या व्यक्तीचे लक्ष दुसरीकडे वेधायचे आणि एका महिलेने चोरी करायची अशी पद्धत आहे. विविध बसस्थानक आणि गर्दीच्या ठिकाणी या महिला अशा पद्धतीने चोरी करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या महिलांकडून इतरही चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.