लोकमत न्यूज नेटवर्कबामखेडा : दोंदवाडे ता.शहादा ग्रामपंचायतीच्या रोहयोंतर्गत २०११ ते २०१५ या कालावधीत रोपवाटिकेच्या कामात तीन लाख ७२ हजार ६०५ रुपयांचा अपहार झाला होता़ याप्रकरणी झालेल्या आंदोलनाची दखल घेत शहादा पंचायत समितीने तत्त्कालीन सरपंच व इतर आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़दोंदवाडे ग्रामस्थांनी शहादा पंचायत समिती ८ नोव्हेंबरपासून ठिय्या आंदोलन सुरु केले होते़ प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतरही गुन्हा दाखल न झाल्याने आंदोलन सुरुच ठेवण्यात आले होते़ आंदोलकांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतल्यानंतर अखेर सारंगखेडा पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांनी धाव घेत सदर अपहार प्रकरणी गुन्हा दाखल केला़सुमारे चार लाख रुपयांच्या या भ्रष्टाचार प्रकरणात सरपंच, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, कृषी अधिकारी आणि इतर दोषींकडून रक्कम वसूल करण्याबाबत डिसेंबर २०१६ मध्ये विभागीय आयुक्तांनी आदेश दिले होते. परंतू या आदेशांची अंमलबजावणी झालेली नव्हती़ यातून ग्रामस्थांनी आंदोलन सुरुच ठेवत अखेर गुन्हा दाखल करण्यास प्रशासनाला भाग पाडले़ या प्रकरणी शहादा पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी सी़टीग़ोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तत्कालीन सरपंच वैशाली ज्ञानेश्वर पाटील, तत्कालीन ग्रामसेवक अरुण संतोष पाटील, ज्ञानेश्वर हिंमत पाटील, नवनीत जंगा ईशी, प्रकाश मंगा पाटील, एकनाथ पुना कोळी, निंबा पाटील, रजेसिंग नारायणसिंग गिरासे सर्व रा़ दोंदवाडे, डी.डी.महाजन रा़ शहादा यांच्याविरुद्ध सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक जगताप करत आहेत़
रोपवाटिका अपहार प्रकरणी अखेर ९ जणांविरोधात तीन वर्षांनी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 11:51 AM