कोठार : तळोदा तालुक्यातील हलालपूर येथे मागील आठ दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे़ गुरुवार रात्रीदेखील हलालपूर ग्रामस्थांनी बिबट्याचा थरार अनुभवला़ तसेच शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास पुन्हा बिबट्या दिसल्याने ग्रामस्थ दहशतीखाली आहेत.गुरूवारी रात्री साडेसहा वाजेच्या सुमारास हलालपूर येथील गावाजवळ जितेंद्र जैन यांच्या केळीच्या शेतात बिबट्याचे दर्शन झाल्याने उपस्थित अनेकांची पळापळ झाली. जैन यांच्या शेतातून बिबट्या बाहेर आला़ व त्याने गावातील कुत्र्यांचा पाठलाग करत त्यांना भक्ष्य बनविण्याचा प्रयत्न केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगीतले. त्यानंतर ग्रामस्थांनी बिबट्याला हुसकावून लावले. कुत्र्यांचा पाठलाग करीत बिबट्या रस्ता ओलांडून दुसऱ्या केळीच्या शेतात शिरला.मागील आठ दिवसांपासून हलालपूर गावात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून वन विभाग मात्र याबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. मागील आठवड्यात शनिवार रात्री तीन वाजेच्या सुमारास हलालपूर येथील राजू गिरासे यांच्या घरात बिबट्या घुसला असल्याची माहिती समोर आली आहे. राजू गिरासे यांचा मुलगा सुरेन्द्रसिंग गिरासे हे घरात झोपले असतांना अचानकपणे त्यांना घरात कुणी तरी घुसल्याचा भास झाला. त्यानंतर ते मोबाईलवर गाणी पाहत झोपले़ परंतु पुन्हा त्यांना कसला तरी आवाज आला व त्यांनी मागे वळून पाहिले तर चक्क बिबट्या त्यांच्या मागे असल्याचे त्यांना दिसले़ काही फुटांच्या अंतरावर बिबट्या असल्याचे समजल्यावर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या हातातील मोबाइल खाली पडून बोबडी वळली़ त्या अवस्थेत त्यांनी प्रतिकार करण्यासाठी हातात काही मिळतेय का याचा शोध घेतला. सुरेन्द्रसिंग यांच्या हालचालीमुळे बिबट्यादेखील घाबरला व बाहेर पडला. सुरेंद्रसिंग यांनी खाटेवर उभे राहून आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला़ परंतु भितीमुळे त्यांचा आवाजदेखील निघत नसल्याचे सुरेंद्रसिंग गिरासे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. केवळ नशीब बलवत्तर म्हणून सुरेंद्रसिंग यांच्यावर बिबट्याने हल्ला केला नाही. दरम्यान, राजू गिरासे यांच्या घरात बकऱ्या बांधल्या असल्यामुळे त्यांना भक्ष्य बनविण्यासाठी बिबट्या घराच्या आत घुसल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या सर्व प्रकारामुळे वेळ आली होती पण काळ याला नव्हता या युक्तीचा प्रत्यय हलालपूर ग्रामस्थांना आला.शुक्रवारी पुन्हा बिबट्या आठळून आल्यानंतर वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली. वनविभाग घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून तत्काळ घटनास्थळी दाखल होईल, असे सर्वांना अपेक्षित होत़े मात्र तब्बल २४ तास उलटुनदेखील वनविभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी आले नव्हते. हलालपूर हे तळोद्यापासून अवघ्या चार ते पाच किमी अंतरावर असूनसुध्दा वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात एखाद्याचा बळी गेल्यावर पंचनामा करायला वनविभागाचे कर्मचारी येतील का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
हलालपूर गावात बिबट्याचा थरार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 3:33 PM