लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील तिलाली गावात गेल्या एक महिन्यापासून वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांना अंधारातच राहावे लागत आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडेही यासंदर्भात तक्रार करण्यात आली आहे. गेल्या एक महिन्यापासून तिलाली गावात अंधाराचे साम्राज्य आहे. त्यामुळे विद्यार्थी, सामान्य नागरिक व व्यावसायिकांचे नुकसान होत असून, वीजेअभावी दैनंदिन कामातील गती मंदावली आहे. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून या भागातील वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.१५ दिवसापासून वीजपुरवठा खंडित राहिल्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे ॲानलाईन तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची त्यांनी दखल घेत दिलगीरी व्यक्त केली व लवकरात लवकर समस्या सोडवू असे सांगण्यात आले. ऐन सनासुदीच्या काळात वीजप्रवाह खंडित झाल्यामुळे दिवाळी अंधारात गेल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. एका महिना होवूनही वीजपुरवठा पूर्ववत झाला नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहे.दरम्यान, इयत्ता पहिली ते महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वीजेअभावी ऑनलाईन तासिकांपासून मुकावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण कसे द्यावे असा प्रश्न पालक व शिक्षकां पुढे निर्माण झाला आहे. वारंवार वीजप्रवाह खंडित होत असल्यामुळे मोबाईल नेटवर्क सेवाही बंद पडते. त्यामुळे ॲानलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यापुुढे समस्या निर्माण होत आहेत. त्याचप्रमाणे अत्यावश्यक संपर्क करण्यासाठी डोंगरावर जावे लागते.गावातील वीज प्रवाह करणारे पोल व तार जीर्ण झाल्यामुळे वारंवार शॉर्ट सर्किट होण्याचे प्रमाण वाढले होते. अचानक शॉर्ट सर्किट होत असल्यामुळे अपघात होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातील जीर्ण विद्युत तारा व पोल नव्याने बसविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्रामध्ये वांरवार बिघाड होत असल्यामुळे विद्युत प्रवाहही खंडित होत आहे. गावातील जीर्ण तारांच्या ठिकाणी केबल टाकणे गरजेचे आहे. यामुळे वीज चोरीला आळा बसून, वीज प्रवाह सुरळीत होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून त्वरित उपयायोजना कराव्यात, अशी अपेक्षा आहे.
तिलाली गाव एक महिन्यापासून अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2020 12:10 PM