लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नवीन शैक्षणिक वर्षातही शाळा बंदच ठेवण्यात आल्या आहेत. यातून मार्ग काढीत शिक्षकांनी शाळास्तरावर नवनवीन तंत्रज्ञानाचा आधार घेत आॅनलाईन शिक्षणाचे धडे देण्यास सुरूवात केली आहे. असे असतानाच आता शिक्षण विभागाने दूरचित्रवाणीवर ‘टिलीमिली’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. त्यामुळे आॅनलाईनमुळे येणाऱ्या अडचणींवर मात करीत हा कार्यक्रम आता प्रभावी ठरला आहे.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध उपाययोजना हाती घेऊन जिल्हा प्रशासनामार्फत अंमलबजावणी केली जात आहे. कोरोनाचा हा धोका ओसरेपर्यंत शाळा न भरविण्याची भूमिका सरकारने घेतली. या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आॅनलाईन पद्धतीने ज्ञानाचे धडे देण्याचे फर्मान काढले. त्यानुसार जिल्हा परिषद तसेच खाजगी शाळाही अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना ज्ञानदान करू लागल्या आहेत. सुरूवातीच्या टप्प्यात ५० टक्केच पालकांकडेच अॅन्ड्रॉईड मोबाईल होते. त्यामुळे जवळपास ५० टक्के विद्यार्थ्यांच्या ज्ञानदानाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. ही उणीव समोर आल्यानंतर तंत्रस्नेही शिक्षकांनी पुढे येत वर्गनिहाय समाज माध्यमावर ग्रुप तयार केले. यावर नियमितपणे आॅनलाईन धडे देण्यात येऊ लागले. मोबाईल नसलेल्या पालकांच्या पाल्यांची सोय त्यांच्या शेजारी वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांकडे केली. त्यामुळे हा प्रश्न काहीअंशी सुटला. आपल्या पाल्याची होणारी गैरसोय विचारात घेऊन काही पालकांनी नवीन मोबाईल खरेदी केले. त्यामुळे आजघडीला मोबाईलधारक पालकांची संख्या वाढली असली तरी ज्ञानदानाची ही प्रक्रिया अनेक तांत्रिक अडचणीच्या पाड्यात सुरू होती. दरम्यान मुलांचे शैक्षणिक नुकसान कमी करण्याच्या अनुषंगानेच सरकारच्या शिक्षण विभागाकडूनही नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दूरचित्रवाणीवर टिलीमिटली हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र वेळ निश्चित केली आहे. याबाबत शाळांनीही पालकांना अवगत केले आहे. कोणत्या वेळे कोणत्या वर्गासाठी कार्यक्रम आहेत याचे वेळापत्रकही दिले आहे. त्यामुळे शाळांनी सुरू केलेल्या आॅनलाईन शिक्षकाच्या मदतीला आता दूरचित्रवाणीवरील टिलीमिली हा कार्यक्रमही धावून आला आहे. दरम्यान यामागे सरकार आणि शाळांचा हेतू प्रामाणिक असला तरी ग्रामीण भागातील भारनियमन आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये येत असलेल्या अडचणींमुळे ज्ञानदानात अडथळे येत असल्याचे उपक्रमशिल शिक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जिल्ह्यात शासकीय, खाजगी आश्रमशाळा तसेच माध्यमिक शाळा, असे एकूण ४१५ माध्यमिक व जिल्हा परिषदेच्या एक हजार ३८६ प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये एक ते आठपर्यंत शिकणारे सुमारे दीड लाख विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत टिलीमिलीचा कार्यक्रम पोहोचविण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. दुर्गम भागातील अडचणी मात्र राहणार असून, त्यात विजेच्या लोडशेडिंगचाही अडथळा आहे.
‘टिलीमिली’ने केली आॅनलाईनवर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:42 PM