लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : विविध योजनांसाठी आवश्यक असलेले आधार कार्ड काढण्यासाठी शहरात तोबा गर्दी होत आहे़ यामुळे उपाययोजनांची मागणी होत असून अधिकच्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचे फज्जा उडत असतानाही आधार केंद्र चालकांचे त्याकडे साफ दुर्लक्ष होत आहे.विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वांनाच आधार सक्तीचे करणत आले आहे़ यामुळे आधार काढण्यासह त्याचे अपडेशन करण्यासाठी नागरिकांची वेळोवेळी धावपळ उडत आहे़ सोमवारी अक्कलकुवा शहरातील आधार सेंटरवर सुमारे २५० नागरिकांची गर्दी जमली होती़ आधारचा अर्ज जमा करण्यासाठी आलेल्या या नागरिकांना कोरोना महामारीचा विसर पडल्याचे चित्र दिसून येत होते़ सोशल डिस्टन्सिंगचा अभाव असताना अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कही नसल्याचे दिसून आले़ दरम्यान रस्त्यावर झालेली गर्दी इतरांना दिसायला नको म्हणून केंद्र संचालकाने जिल्हा परिषद शाळेच्या आवारात माणूस बसवून अर्ज गोळा करत तारीख देण्यास सुरूवात केली होती़ एकाचवेळी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या़ दरम्यान येथून काही अंतरावर तालुका प्रशासनाचे मुख्यालय आहे़ तेथेही याबाबत माहिती नव्हती काय, असा प्रश्न उपस्थित होतो आहे़ येथील नागरिकांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीला दिल्यानंतर त्याठिकाणी प्रतिनिधीने भेट दिल्यावर केंद्र संचालकाला जाग येऊन गर्दी पांगवण्यासाठी त्याने तहसील व पोलीस ठाण्याकडून मदत घेतली़अक्कलकुवा तालुक्यात मोलगी, खापर आणि अक्कलकुवा येथे आधार नोंदणी केंद्र आहेत़ मोलगी व खापर येथे केंद्र असले तरी मात्र याठिकाणी इंटरनेटची समस्या कायम असते़ यामुळे नागरिक अक्कलकुवा येथे धाव घेतात़ यातून अक्कलकुवा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने याठिकाणी आधार नोंदणी केंद्र वाढवण्याची मागणी आहे़तालुक्याचे ठिकाण असलेल्या अक्कलकुवा शहरात एकच आधार कार्ड सेंटर आहे़ यामुळे येथे नोंदणीसाठी दररोज नागरिकांची गर्दी होते़ सातपुड्याच्या दुर्गम भागासह तालुक्यातील सपाटीलच्या गावांमधूनलहान बालकांसह महिला आणि वयोवृद्ध येथे आधार नोंदणीसाठी येतात़ बसण्यासाठी त्यांना जागा नसल्याने नोंदणीची वेळ येईपर्यंत तासन्तास उभे रहावे लागते़ यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो़ जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून आधार सेंटर्स वाढवण्याची मागणी होत आहे़
अक्कलकुव्यातील आधार केंद्रांवर होतेय तोबा गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:40 PM