‘मतदान व्हयनं का मंग मी बांधवर अन् तू खेतमा’
शहादा तालुक्यात बुधवारी प्रचारफेऱ्या रंगल्या होत्या. या फेरीत एक शेतमजूर उमेदवारासोबत फिरत होता. यावेळी शेतमालकाने त्याला हात देत काम शिल्लक असल्याचे सांगितले. त्यावर त्याने ‘मतदान व्हई जावूद्या मग मी खेतमा येसू’ त्यावर शेतमालकाने ‘मीबी दुसरा पॅनलमा शे.. तू खेतमा आनी मी बांधवर येसू’ असे सांगितले. दोघांच्या या मैत्रीपूर्ण संवादाला पाहून इतरही त्यांची फिरकी घेत होते.
शहादा तालुक्यात उलाढालीचे आकडेच मोठे
शहादा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मोहिदे गावाची निवडणूक यंदाही चर्चेचा विषय आहे. गेल्या १० दिवसांपासून मोहिदेलगतच्या हाॅटेल्समध्ये गर्दी मावत नव्हती. परंतु बुधवारी ही गर्दी अचानक ओसरली, यातून एका हाॅटेल व्यावसायिकाकडून माहिती घेतली असता, गेल्या १० दिवसात काही लाख रुपयांचा व्यवसाय झाल्याची माहिती त्यांनी दिली. जेवढं लाॅकडाऊनमध्ये गमावलं त्यापेक्षा दुप्पट ह्या १० दिवसात कमावल्याची प्रतिक्रिया त्याने दिली. दरम्यान, मोहिदे गावाची निवडणूक यंदाही चुरशीच्या असल्याने मोठी आर्थिक उलाढाल झाल्याने अनेकांनी ‘आपलंपण नाव मोहिदे ग्रामपंचायतीच्या यादीत पाहिजे भो..’ अशी अपेक्षाच मित्रांजवळ व्यक्त केली.