लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : गेल्या काही महिन्यांपासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदाम परिसरात मद्यपींनी धिंगाणा घातला असून यामुळे आमच्या कामकाजावर परिणाम होत आहे. या तळीरामांचा बंदोबस्त करा, अशी विनंती माजी नगराध्यक्ष तथा व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी प्रकाश जैन यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांच्याकडे केली आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात सपकाळे यांचे उपस्थितीत शहरातील प्रतिष्ठित नागरिक, सराफ असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, व्यापारी असोसिएशन व शांतता कमिटी सदस्यांच्या झालेल्या बैठकीत पोलिस अधिकाऱ्यांनी व्यापारी व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. व्यापाऱ्यांच्या वतीने माजी नगराध्यक्ष प्रकाश जैन यांनी बाजार समितीत मद्यपींकडून सुरू असलेल्या गैरप्रकारावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, दररोज संध्याकाळी सहा ते साडेसहा वाजेनंतर किमान २०० पेक्षा अधिक मद्यपी हे रात्री दहापर्यंत गोदाम परिसरातील मोकळ्या जागेवर मद्यपान करीत असतात. या तळीरामांमध्ये भांडणेही होतात. शेतकºयांकडून खरेदी केलेला माल मार्केट कमिटीच्या शेडमध्ये ठेवतो. संध्याकाळी आमचे काम सुरू असताना या तळीरामांकडून आम्हाला त्रास दिला जातो. अनेकदा व्यापारी व तळीरामांमध्ये वादही झाला आहे. मार्केटमध्ये खुलेआमपणे दारू पिण्याचा हा अनोखा प्रकार शहरात सुरू असून यामुळे सर्वाधिक त्रास व्यापाºयांना सहन करावा लागतो. या भागात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून तळीरामांचा बंदोबस्त करावा, अशी सूचना मांडल्यानंतर उपस्थित सर्व व्यापारी व प्रतिष्ठीत नागरिकांनी त्यास अनुमोदन देत पोलीस प्रशासनाने अशांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. व्यापाºयांच्या मागणीनंतर सपकाळे यांनी या परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात येऊन तळीरामांवर कारवाई करण्याचे संकेत दिले.
मद्यपींच्या त्रासामुळे शहाद्यातील व्यापारी वैतागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 12:41 PM