लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील खापरजवळील हॉटेल टिपटॉपजवळ गुरुवारी दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास लोखंडी पाईप भरलेला कंटेनर उलटून अपघात झाला. या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुजरात राज्यातील गांधीधाम येथून औद्योगिक कामांसाठी आवश्यक असणारे मोठे लोखंडी पाईप घेऊन कर्नाटक राज्यातील कडपा येथे ट्रक (क्रमांक जीजे-12 बीव्ही 8973) जात होता. गुरुवारी दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास हा ट्रक नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावर खापर गावाजवळील टिपटॉप हॉटेलजवळ आला. एक कार या ट्रकला ओव्हरटेक करून पुढे गेली व अचानक ती कार ट्रकच्या पुढे आली. कारला वाचविण्यासाठी ट्रक चालकाने जोरात ब्रेक लावण्याचा प्रय} केला असता कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. चालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे पाईप बांधलेली लोखंडी साखळी तुटली. त्यामुळे हा कंटेनर रस्त्यावर उलटला. कंटेनर उलटल्याने कंटेनरमधील पाईप रस्त्याच्या उजव्या बाजूला पसरले. त्यावेळी सुदैवाने कोणतेही अन्य वाहन रस्त्यावरून मार्गक्रमण करीत नव्हते नाही तर या अपघातात मोठी जीवितहानी झाली असती. या अपघातात कंटेनर चालक संग्रामसिंह रावत हा जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या अपघातात कंटेनरच्या कॅबिनचे मोठे नुकसान झाले आहे.या अपघातानंतर रस्त्यावर मोठमोठे लोखंडी पाईप रस्त्यावर व रस्त्याच्या कडेला पसरल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बराच वेळ विस्कळीत झाली. अपघातानंतर काही काळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे मोठय़ा प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झाला. संध्याकाळी उशिरार्पयत या अपघाताची पोलिसांत नोंद करण्यात आली नव्हती. संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास पोलिसांच्या मदतीने रस्त्यावरील ट्रक व पाईप हटविण्यात आहे. दरम्यान, या अपघातामुळे नेत्रांग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त, अनियंत्रित वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दोन महिन्यांपूर्वी देखील अक्कलकुवा ते खापर दरम्यानच्या कडवामहू फाटय़ानजीक असाच पाईप घेऊन जाणारा कंटेनर अचानक ब्रेक लावल्यामुळे उलटला होता. या राष्ट्रीय महामार्गावर मागील आठवडापासून दररोज अनेक ट्रकांमधून मोठ-मोठय़ा पाईपांची वाहतूक सुरू आहे. राष्ट्रीय महार्गावर धावणारी शेकडो जड व अवजड वाहने वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून वाहतूक करत असतात. भरधाव व ओव्हरलोड वाहनांमुळे तळोदा ते खापरदरम्यान ट्रक व कंटेनर उलटण्याचे प्रकार नित्याचे झाले आहे. राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरू असून शेकडो नागरिकांना अपघातात जीव गमवावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त व अनियंत्रित वाहतुकीला आळा घालावा तसेच सुरक्षा उपाययोजनादेखील कार्यान्वित कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.
लोखंडी पाईपांचा कंटेनर उलटल्याने वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 12:13 PM