लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धडगाव व मोलगी रस्त्यावर अनेक येणारे व घाटांवर कठडे बसविण्यात आले नाही. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी पूल व घाटांवर कठडे तयार करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.दुर्गम भागात गुजरात, मध्यप्रदेश व महाराष्ट्र या तिन्ही राज्यांना जोडण्यासाठी ब्रिटीश काळातच रस्ते बनवले होते. त्या रस्त्यांपैकी दरा ता. शहादा ते मोलगी हा एक रस्ता आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर हा रस्ता नव्याने तयार झाला. या रस्त्यावर १९६० दशकात काही पुलांची कामेही करण्यात आली. डाब ता. अक्कलकुवा येथे उगम पावणाºया तथा नर्मदेच्या उपनद्या उदय व देवानंद या दोन्ही नद्या या रस्त्यावर आल्या आहे. या धडगाव- मोलगी भागातल्या सर्वात मोठ्या नद्या असल्याने दोन्ही ठिकाणी पुलाची नितांत गरज भासली. रस्त्याच्या नवीन कामात या नद्यांवर पुल बनले. त्यामुळे तिन्ही राज्यातील प्रवाशांच्या सोयीत भर पडली, यात शंका नाहीच. उदय नदीवरील पुलाला सुरुवातीपासूनच कठडे आहे, त्या पुलाच्या बांधकामाची रचनाच कठडेयुक्त आहे. तशी रचना कुंडल येथील देवानंद नदीवरील पुलाची ठेवली गेली नाही. लोखंडी कठड्यांची रचना ठेवण्यात आली. लोखंडी कठड्यांची रचना ही दिर्घकाळ टिकत नसून पुलाची लवकरच दुरावस्था होते. परंतु लोखंडी कठड्यांसाठीही देवानंद नदीवर बांधकाम विभागाकडून ६० वर्षाच्या कालावधीतच करण्यात आली नाही. त्यामुळे वाहतुकीसाठी सुविधा असूनही हा पूल तीन राज्यातील प्रवाशांना वषार्नुवर्षे धोक्याचा ठरत आला आहे. पुलाचे कठडे तयार करण्यासाठी आजपर्यंत बांधकाम विभागामार्फत कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही. २००७ मध्ये देवानंद नदीला महापूर आला होता, त्या पुरात पुलाच्या एका बाजूचा भराव पूर्णत: वाहून गेला होता. रस्ता तुटून वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती, त्यावर मात करीत वाहतुक सुविधा पुर्ववत करण्यासाठी तो भराव भरण्यात आला. याशिवाय पुलाची क्षती होत असल्याचे निदर्शनाच येताच तिन्ही राज्यातील प्रवाशांचे संभाव्य संकट टाळण्यासाठी तातडीने डागडुजीही करण्यात आली. परंतु कठडे बांधण्यासाठी मात्र कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही. त्यामुळे कठड्यांबाबत बांधकाम यंत्रणाच उदासिन असल्याचे स्पष्ट होते.मोलगीपासून सात किलोमिटर अंतरावरील पिंप्रापाणी, खुंटामोडीचा डाबपाणीपाडा, कुंडल व खुंटामोडी दरम्यान असलेल्या तीन घाट, कुंडल येथील कारभारीपाड्याजवळील तीव्र दरी, कुंडलचे दोन्ही पुल या ठिकाणी सुरक्षीत वाहतुकीसाठी कठडे बांधण्यात यावे,अशी मागणी धडगाव व मोलगी भागातील प्रवासी व वाहनधारकांमार्फत करण्यात आली आहे. तर सुरवाणी व मोजरादरम्यान असलेल्या अपघाती घाटातील सुरक्षा गेटाची पार दुरवस्था झाली आहे. ही दुरवस्था सुरक्षीत वाहतुकीला धोकाच ठरत आहे. या ठिंकाणी अनेक अपघात झाले आहे. पुन्हा या ठिकाणी अपघात होऊ नये, यासाठी पूर्णपणे व सुरक्षीत कठडे तयार करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे.
दुर्गम भागातील वाहतुक सुरक्षा वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 12:50 PM