लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहरासाठी बहुप्रतिक्षित असलेल्या जलशुध्दीकरण प्रकल्पाचा हस्तांतरण सोहळा शनिवारी पार पडला. हा प्रकल्प आता पालिकेच्या ताब्यात आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीयमंत्री माणिकराव गावीत यांच्या हस्ते हस्तांतरण करण्यात आले. या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावीत, नगराध्यक्षा रेणूका गावीत, उपनगराध्यक्ष हारुन खाटीक, पालिकेचे गटनेते गिरीष गावीत, विरोधी पक्ष प्रमुख नरेंद्र नगराळे, माजी नगरसेवक विनय गावीत, भालचंद्र गावीत, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रा.नवल पाटील, विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक, पालिका मुख्यालयातील राजेंद्र शिंदे, कार्यालय अधीक्षक मिलींद भामरे, अभियंता सुधीर माळी, आर.सी. गावीत, संदीप गावीत, फारुख शाह, जैनु गावीत, जीवन प्राधीकरण विभागाचे अभियंता बी.बी.बागुल, जळगाव केंद्राचे एस.सी. निकम, अभियंता एम.आर. जाधव, सतिष बागुल, हेमंत जाधव, परशराम ठाकरे, राजू गावीत, वामन अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते. दैनंदिन दोन लक्ष लिटर पाणी शुध्द करण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाची सुरुवात सन 2007 साली करण्यात आली. सन 2012 मधे प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन पाच वर्ष लोटली होती. डिसेंबर 2014 पासून प्रकल्पातून शुध्द पाण्याचे वितरण सुरु करण्यात आले. प्रकल्पाची उभारणी महामार्गा लगत करण्यात आली असून जलशुध्दीकरण संयंत्र, कर्मचारी निवासस्थान यासह जलकुंभ उभारण्यात आले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून एक कोटी 96 लक्ष 37 हजार रुपये खर्चाच्या या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. माणिकराव गावीत यांनी हा प्रकल्प पालिकेची मोठी उपलब्धी असल्याचे सांगितले. शहरातील सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी भूमिगत गटार योजना पूर्णत्वाकडे असून लोकविकासाच्या असंख्य योजना राबविण्यात आल्याने शहराचा चेहरा मोहरा बदलला असल्याचे ते म्हणाले. प्रस्तावित करतांना गटनेते गिरीष गावीत यांनी प्रकल्पाची तांत्रिक व प्रशासकीय माहिती दिली. शहर विकासाचा महत्वाचा टप्पा या प्रकल्पामुळे गाठला गेला असून लवकरच नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. नागरिकांच्या पोटाच्या विकारांनाही पूर्ण विराम मिळू शकेल असे ते म्हणाले. शहरात या पंचवार्षिकेत झालेल्या कल्याणकारी योजनांची माहिती देतांना निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाल्याचे शेवटी ते म्हणाले.
नवापुरात जलशुद्धीकरण प्रकल्पाचा हस्तांतर कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:52 PM