गुरुवारी सकाळी तळोदा शिवारातील शेतकरी शशिकांत व उमाकांत शेंडे या शेतकरी बंधूंना आपल्या शेतापासून शंभर फुटावर सिंहसदृश प्राणी दिसून आला होता. शिवाय तेथे जवळच बिबट्याची जोडीदेखील दिसून आली होती. येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिंह तळोद्यात काय राज्यातही नसल्याचे सांगितले आहे. तरीही शेतकऱ्यांनी दावा केल्यामुळे वन विभागाने गुरुवारी सायंकाळी ज्या ठिकाणी म्हणजे शेतात हे प्राणी दिसून आले आहेत. तेथे दोन ट्रॅप कॅमेरे कर्मचाऱ्यांनी बसविले आहेत. एक कमेरा ज्या लिंबाचा झाडास प्राण्याने ओरबडले आहे. तेथे बसविला असून, दुसरा पलीकडे बसविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. सात ते आठ महिन्यांपूर्वीदेखील चिनोदा शिवराजवळ एका शेतात राजकीय पदाधिकारी व मजुरांनी बिबट्याचा थरार अनुभवला होता. तेव्हा वनविभागाने तेथेही ट्रप कॅमेरे बसविले होते. मात्र, हे जंगली प्राणी कॅमेरेत कैद झाले नव्हते. आता पुन्हा कालच्या घटनेवरून शेतात कॅमेरे बसविण्यात आले आहेत. साहजिकच नागरिकांचे लक्षही या कॅमेऱ्याकडे लागले आहे. हे प्राणी त्यात कैद होतात की, वनविभागाला गुंगारा देतात याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे.
वनविभागाने पिंजरेच लावावे
सदर प्राण्यांच्या शोधासाठी वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावले असले तरी या प्राण्यांच्या ठोस बंदोबस्तासाठी पिंजरेच लावावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. वास्तविक शहराच्या आजूबाजूस बिबट्याचा वावर असल्याच्या तक्रारीचा वनविभागाचे अधिकारीदेखील मान्य करीत असतात. तरीही पिंजरे लावले जात नाही. याविषयी जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पिंजराबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता, असे ठोस कारण शिवाय लावता येत नाही, असे सांगितले जाते. आधीच या हिंस्र प्राणीच्या शेत शिवारातील वावरामुळे शेतकरी, शेतमजूर यांच्यामध्ये अक्षरश: दहशत पसरली आहे. कुणीच शेतात जायला तयार नाही. त्यामुळे कामेच ठप्प झाली आहेत. अशी वस्तुस्थिती असताना त्यांच्या बंदोबस्ताबाबत काहीच उपाययोजना हाती घेतल्या जात नाही. एवढेच नव्हे तर वनविभागाचे वरिष्ठ अधिकारीदेखील याविषयी उदासीन भूमिका घेत असल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.