मनोज शेलार
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बिनविरोधचा ट्रेंड सद्या ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून येत आहे. भाऊबंदकीत वाद नको, राजकीय वैमनस्य नको, एकी साधून गाव विकास होत असेल तर त्याला पाठींबा देणे आणि महत्वाचे म्हणजे आर्थिक बचत करणे हा उद्देश यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून येत आहे. दुसरी बाब म्हणजे थेट सरपंच निवड रद्द होणे आणि सरपंचपदाचे आरक्षण न निघणे शिवाय नेत्यांच्या दृष्टीने पुढील काळात कुठलीही सार्वजनिक निवडणूक नसणे अर्थात कार्यकर्ते सांभाळण्याचे सद्यातरी टेन्शन नसणे ही कारणे देखील ‘बिनविरोध’ ट्रेंडला चालना देणारे ठरत आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजली जाणारी शनिमांडळ ग्रामपंचायत सामोपचाराने बिनविरोध होणे आणि तीच पार्श्वभूमी असलेली खोंडामाळी ग्रामपंचायत देवीच्या मंदीराच्या बांधकामाच्या माध्यमातून बिनविरोध होणे हे राजकीय पक्ष आणि प्रशासनाच्या दृष्टीनेही समाधानाची बाब ठरली आहे. नंदुरबार तालुक्यताील २२ ग्रामपंचायीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. सर्वच ग्रामपंचायती या पूर्व भागातील अर्थात नंदुरबार मतदारसंघातील आहेत. नंदुरबार तालुक्याचा पश्चीम भाग नवापूर मतदारसंघात येतो. त्यामुळे राजकीय दृष्ट्या या ग्रामपंचायतींकडे वेगळ्या दृष्टीकोणातून पाहिले जाते. पूर्व भागातील ग्रामपंचायती या विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुकीच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाच्या मानल्या जातात. त्यामुळे या २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.अर्ज छाननीनंतर ७० टक्के चित्र स्पष्ट झाले आहे. आता सोमवार, ४रोजी माघारीच्या अंतीम क्षणानंतर उर्वरित चित्र स्पष्ट होणार आहे. २२ ग्रामपंचायतींमध्ये शनिमांडळ, खोंडामळी, भालेर, कोपर्ली, न्याहली, वैंदाणे ही काही गावे नेत्यांच्या दृष्टीने राजकीय दृष्ट्या महत्वाची मानली जातात. प्रशासन दप्तरी देखील यातील काही ग्रामपंचायतींची राजकीय दृष्ट्या संवेदनशील म्हणून नोंद आहे. अशा ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर होताच राजकीय दृष्ट्या हालचाली गतीमान झाल्या होत्या. परंतु येत्या काळात कुठलीच सार्वजनिक निवडणूक नसल्याचे पहाता नेत्यांनीही सर्वच कार्यकर्त्यांना सामोपचाराने घेण्याचे आवाहन केले. खोंडामळी या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी देवीच्या मंदीर बांधण्याचा निर्णय घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आणि त्यांना यशही आले. जेवढ्या जागा तेवढेच अर्ज आल्याने ही ग्रामपंचायत बिनविरोध होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. शनिमांडळ सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीत देखील सामंजस्य आणि एकीचे चित्र दिसले. तिन्ही प्रमुख राजकीय पक्षांचे समान सदस्य घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयोग यशस्वी झाला. शनिमांडळला लागूनच असलेल्या तिलाली ग्रामपंचायतीतही हा प्रयोग यशस्वी झाला. निंबेलही बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. सिंदगव्हाणही त्याच मार्गावर आहे. याशिवाय काही ग्रामपंचायतीत सरळ निवडणूक लढत रंगणार आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी तालुक्यातील ज्या घटनेतील तरतुदीनुसार ग्रामपंचायती बिनविरोध होतील त्या ग्रामपंचायतींना जिल्हा परिषद जनसुविधा योजनेअंतर्गत १५ लाखाचा निधी विकास कामांसाठी देण्याचे जाहीर केले आहे. त्याचाही परिणाम सकारात्मक होणार आहे.एकुणच नंदुरबार तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका म्हटल्या म्हणजे म्हणजे मोठी चुरस राहत होती. नेते देखील आपल्या कार्यर्त्यांना टिकवून ठेवण्यासाठी या निवडणुकांमध्ये रस घेत होते. परंतु यंदा निवडणुकांचे बदलले नियम, सरपंच पदाच्या आरक्षणाची अनिश्चीतता आणि थेट सरपंचपदाची बाद झालेली पद्धत यामुळे या निवडणुकांमध्ये फारशी राजकीय रस्सीखेच नसल्याचेच चित्र दिसून येत आहे. केवळ स्थानिक प्रश्न आणि गावगाड्यातील राजकारण याच भोवती काही गावांच्या निवडणुका रंगणार असल्याचे स्पष्ट आहे.