ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.9 - विश्व आदिवासी दिनानिमित्त नंदुरबार येथे भव्य सांस्कृतिक रॅलीसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाभरात देखील विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. पारंपारिक आदिवासी वेशभूषा करून नृत्य करीत हजारो आदिवासी बांधव बुधवारी एकत्र आले होते. यंदा आदिवासी दिनाचा उत्साह काही औरच होता. शहरातील विविध भागातील आदिवासी मंडळे, संघटना, संस्था यांच्यातर्फे त्या त्या भागातून रॅली काढण्यात आली. मुख्य कार्यक्रम बाजार समितीच्या आवारात होता. रॅलीने जावून अनेक जत्थे महाराणा प्रताप पुतळ्याजवळ एकत्र जमली होती. तेथून संयुक्त रॅली काढण्यात आली. आदिवासी महासंघासह विविध संघटनांनी यंदा एकत्र उपक्रम साजरा केल्याने त्याला भव्यदिव्य स्वरूप आले होते. दुपारी दोन वाजता बाजार समिती आवारात व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. यावेळी राजस्थानमधील मानसिंग करासिया यांनी व्याख्यान दिले. यावेळी इतरही विविध कार्यक्रमांचे या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते.