मनोज शेलार, नंदुरबार : आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यातील आश्रमशाळा शिक्षकांच्या १७ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या क्षमता चाचणी परीक्षेत गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी दिली. या चाचणी परीक्षेवर शिक्षक संघटनांनी बहिष्कार टाकला होता.आश्रमशाळा शिक्षकांची आपल्या विषयाची अध्ययन क्षमता तपासणीसाठी आदिवासी विकास विभागाने १७ सप्टेंबर रोजी राज्यभरात क्षमता चाचणी परीक्षा घेतली होती.
या परीक्षेवर सुरुवातीपासूनच शिक्षक संघटनांनी बहिष्कार टाकला होता. त्यामुळे राज्यभरात तब्बल ८५ टक्के शिक्षक या परिक्षेपासून दूरच राहिले. याबाबत बोलतांना आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी सांगितले, चांगल्या दृष्टीकोणातून ही चाचणी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु गैरसमज करून शिक्षकांनी त्यावर बहिष्कार टाकला. विभागाच्या प्रशासकीय निर्णयाविरोधात हा प्रकार असल्याने गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात येणार आहेत. तशा सुचना लवकरच आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयांना वरिष्ठ पातळीवरून दिल्या जातील असेही डॉ.विजयकुमार गावित यांनी स्पष्ट केले.
यामुळे मात्र शिक्षकांमध्ये पुन्हा रोष निर्माण होण्याची शक्यता असून नोटीसा कधी दिल्या जातात, त्यांना काय उत्तरे दिली जातात याकडे आता आदिवासी विकास विभागाचे लक्ष लागून आहे.