लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : काँग्रेसने आदिवासी, ओबीसी, दलितांचा केवळ मतांसाठी वापर केला. मात्र, भाजप सरकारने ख:या अर्थाने या समाजाच्या उत्थानासाठी काम केल्याचे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवापूर येथील जाहीर सभेत बोलतांना केले.भाजप उमेदवार भरत गावीत यांच्या प्रचारासाठी अमित शहा यांची नवापुरात सभा झाली. यावेळी बोलतांना शहा यांनी आदिवासी समस्यांवर थेट घाव घालत आदिवासींच्या हितासाठी केवळ भाजपने काम केले. स्व.अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असतांना स्वतंत्र आदिवासी विभाग सुरू करण्यात आला. राज्यात देखील भाजप सरकार सत्तेवर आल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ओबीसी विभाग स्वतंत्र केला. काकासाहेब कालेलकर यांनी दिलेल्या ओबीसी अहवालाकडे काँग्रेस सरकारने नेहमीच दुर्लक्ष केले होते. 370 कलम रद्द करण्याची हिंमत केवळ भाजप सरकारने दाखविली. काँग्रेस त्यावरही राजकारण करणीत आहे, टिका करीत आहे. आदिवासींच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यास हे सरकार बांधील आहे. आदर्श आदिवासी जिल्हा निर्माण करण्याचा संकल्प आहे. उमेदवार भरत गावीत हे निवडून आल्यावर त्यासाठी काम करणार आहे. नवापूरच्या सभेचे नियोजन नव्हते. परंतु मी खास करून सभा लावून घेत येथे आलो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. व्यासपीठावर उमेदवार भरत गावीत यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक जाजू, खासदार डॉ.हिना गावीत, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत, पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी उपस्थित होते.
आदिवासी, ओबीसींचे उत्थान केवळ भाजपनेच केले- अमित शहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 1:34 PM