नंदुरबार जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुकीचे रणशिंग फुकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 1:11 PM
राजकीय पक्ष सरसावले, गट, गणाच्या आरक्षणावर भर
<p>नंदुरबार : जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुकीचे रणशिंग फुकले गेले आहे. निवडणूक आयोगाने गट व गणांच्या रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानंतर गट, गणांचे आरक्षण, मतदार याद्या जाहीर करणे व त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. साधारणत: नोव्हेंबर महिन्याच्या तिस:या आठवडय़ात निवडणुका होण्याची शक्यता आहे. सद्य स्थिती पहाता काँग्रेस व भाजपमध्येच सरळ लढत होणार आहे. आघाडी किंवा युतीबाबत निर्णय होण्यास अद्याप बराच कालावधी आहे.नंदुरबार जिल्हा 1998 साली वेगळा झाल्यानंतर 1999 साली जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली. एक टर्म वगळता सतत काँग्रेसचीच सत्ता जिल्हा परिषदेत राहिली आहे. सद्या देखील काँग्रेस सत्तेवर असून राष्ट्रवादी प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आहे. भाजपचा एक सदस्य निवडून आलेला आहे. यंदा होणा:या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप यांच्यातच खरी लढत रंगणार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना काय आणि कसा निर्णय घेतात याकडे पहाणेही महत्वाचे ठरणार आहे.पाचवी पंचवार्षीक निवडणूकनंदुरबार जिल्हा परिषदेची ही पाचवी सार्वत्रिक निवडणूक आहे. 1999 साली पहिली निवडणूक झाली होती. त्यावेळी काँग्रेसला बहुमत मिळाले होते. तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख विरोधी पक्षात होती. त्यानंतरच्या निवडणुकीत देखील काँग्रेसनेच बहुमत मिळविले होते. 2008 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने बहुमत मिळवून सत्ता स्थापन केली होती. गेल्या पंचवार्षीकला झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने काठावरील बहुमत मिळविले होते. आता यंदा पाचवी सार्वत्रिक निवडणूक होत आहे.काँग्रेस-भाजप आमनेसामनेयंदाच्या निवडणुकीत काँग्रेस व भाजप यांच्यात लढत रंगणार आहे. आमदार डॉ.विजयकुमार गावीत हे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेसला भाजपविरोधात लढावे लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस सोबत किंवा अन्य पक्षासोबत आघाडी करते की स्वतंत्ररित्या निवडणूक लढवते हे महत्वाचे ठरणार आहे. शिवसेना देखील नंदुरबार पालिकेचा कित्ता गिरवते किंवा कसे याबाबतही उत्सूकता आहे.शहादा व नंदुरबारवर भरजिल्हा परिषदेत बहुमताच्या दृष्टीने शहादा व नंदुरबार तालुक्यावरील जागांवर भिस्त असते. शहादा तालुक्यात सर्वाधिक 14 जागा असून त्या खालोखाल नंदुरबार, नवापूर व अक्कलकुवा या तालुक्यांमध्ये प्रत्येकी दहा जागा आहेत. धडगावात सात तर तळोदा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पाच जागा आहेत. प्रभाग रचनेचा कार्यक्रमप्रभाग रचनेचा कार्यक्रम 10 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. जिल्हाधिकारी हे प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव अनुसूचित जाती, जमातीकरीता आरक्षणासह विभागीय आयुक्त यांच्याकडे 10 ऑगस्टर्पयत सादर करण्यात येणार आहे. 20 ऑगस्टला विभागीय आयुक्त प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता देणार आहेत. 23 ऑगस्ट रोजी आरक्षण सोडतीची सुचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आरक्षणाची सोडत जिल्हा परिषद गटाची 27 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात तर त्याच दिवशी त्या त्या तालुका मुख्यालयात तहसीलदार हे पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत काढणार आहेत. 30 ऑगस्ट रोजी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसुचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यावर 7 सप्टेंबर्पयत हरकती व सुचना स्विकारल्या जाणार आहेत. 25 सप्टेंबर रोजी अंतिम प्रभाग रचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.महिला आरक्षणस्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण असल्यामुळे निम्मे अर्थात 27 जागा या महिलांसाठी राखीव राहणार आहेत. याशिवाय ओबीसींसाठी कुठले गट राखीव होतात याकडेही अनेकांचे लक्ष लागून आहे. गेल्यावेळी अनेकांचे गट हे महिलांसाठी राखीव झाल्याने मोठी गोची झाली होती. यावेळी तरी तसे होऊ नये यासाठी अनेकांनी मनोमन प्रार्थना सुरू केली आहे.