नंदुरबार तालुक्यातील वटबारे येथील लिंबा सोमा ठेलारी हे दरवर्षी शहादा तालुक्यात मेंढ्या चारण्यासाठी येत असून या वर्षी अनरदबारी पुसनद परिसरात मुक्काम होता. पाऊस सुरू झाल्याने ते घराकडे रवाना झाले होते. दरम्यान, शुक्रवारी दुपारी प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिर परिसरात नवीन वसाहतीत मेंढ्या चरत असताना अचानक बेशुद्ध पडण्यास सुरुवात झाली. या भागात विषारी गवत खाल्ल्याने हा प्रकार ओढावला. यात १२ मेंढ्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रकाशा व भालेर येथील पशुवैद्यकीय कर्मचारी तातडीने या ठिकाणी हजर झाले होते. त्यांनी औषधोपचार केल्याने उर्वरित मेंढ्यांचा जीव वाचला. मेंढपाळाचे साधारण ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, मेंढपाळाला शासनाने भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रकाशा येथे विषारी गवत खाल्ल्याने १२ मेंढ्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 4:24 AM