ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.30 - गावाजवळील धरणात आंघोळीसाठी गेलेल्या दोन बालकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना खेकडा, ता.नवापूर येथे 29 रोजी घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
रिकेश विक्रम गावीत (13) व हरिष संदीप मावची (15) रा.खेकडा असे मयत बालकांची नावे आहेत. पोलीस सूत्रांनुसार, खेकडा गावाच्या शिवारात दरीफळी धरण आहे. त्यात ब:यापैकी पाणी आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे गावातील रिकेश व हरिष ही दोन बालके दुपारच्या वेळी आंघोळीसाठी धरणावर गेली. आंघोळ करतांना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला. वेळ होऊनही बालके घरी न आल्याने नातेनवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता ते धरणाच्या पाण्यात बुडल्याचे दिसून आले. नवापूर उपजिल्हा रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करून सायंकाळी उशीरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
एकाच वेळी गावातील दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. याबाबत माधव शंकर गावीत, रा.खेकडा यांनी खबर दिल्याने नवापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.