नंदुरबार : आपसातील वादातून दोन कुटूंबात झालेल्या मारहाणीत चारजण जखमी झाले. परस्पर विरोधी फिर्यादीत चार लाखाचा ऐवज चोरून नेल्याचा व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्कलकुवा येथील भाजीपाला मार्केट परिसरात ही घटना घडली.अक्कलकुवा येथील शितल अनिलकुमार जैन व प्रविण जेठमल जैन या दोन कुटूंबात आपसात वाद होता. या वादाचे पर्यावसान 7 फेब्रुवारी रोजी मारहाणीत झाले. शितल जैन यांच्या फिर्यादीनुसार प्रवीण जैन व इतर तिघांनी घरात घुसून घरातील सदस्यांना लोखंडी सळईने बेदम मारहाण केली. शिवाय कपाटातील दोन लाख 17 हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागीने देखील जबरीने चोरून नेले. मारहाणीत शितल अनिलकुमार जैन यांच्यासह अनिलकुमार राणुलाल जैन, अशोक राणुलाल जैन हे जखमी झाले. शितल यांच्या फिर्यादीवरून प्रविण जेठमल जैन, नरेश जेठमल जैन, अरिहंत प्रविण जैन व आशिष प्रविण जैन सर्व रा.अक्कलकुवा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसरी फिर्याद 36 वर्षीय महिलेने दिली. अक्कलकुव्यातील अनिल चोपडा यांच्या घरासमोर घडली. अनिल राणुलाल चोपडा व इतरांनी अश्लिल हातवारे करून अंगलट करू लागला. महिलेचा मुलगा सोडविण्यासाठी गेला असता त्याच्या डोक्यावर लोखंडी सळईने वार करण्यात आला. त्याच्या खिशातील सात हजार रुपये रोख व महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी व मंगळसूत्र असा एकुण एक लाख 82 हजार 500 रुपयांचा ऐवज जबरीने चोरून नेला. याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अनिल राणुलाल चोपडा, शितल राणुलाल चोपडा, विजय राणुलाल चोपडा, अशोक राणुलाल चोपडा, कमला राणुलाल चोपडा व इतर दोनजण सर्व रा.अक्कलकुवा यांच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात मारहाण, जबरी चोरी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक भंडारे व फौजदार एम.जे.पवार करीत आहे.
अक्कलकुव्यात दोन कुटूंबात मारहाण, लाखोंचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 6:28 PM