मनोज शेलार, नंदुरबार : अक्कलकुवा येथील व्यापाऱ्याने नागपूर येथील कंपनीतून मागविलेले १३ लाख ३९ हजार रुपयांचे लोखंड दोघांनी अक्कलकुवा येथे न आणता परस्पर वाटेत विकून टाकल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी व्यापाऱ्याच्या फिर्यादीवरून दोघांविरूद्ध अक्कलकुवा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२९ जानेवारी ते ५ फेब्रुवारीदरम्यान ही घटना घडली. पोलिस सुत्रांनुसार, अक्कलकुवा येथील बांधकाम वस्तू विक्रेते मनोज राणुलाल जैन यांनी उमरेड, जि. नागपूर येथील कंपनीतून २४.९२० मे. टन वजनाचे लोखंड मागविले होते. ट्रान्सपोर्टमार्फत त्यांनी अक्कलकुवा येथे आणण्यासाठी ऑर्डर दिली. त्यानुसार मालट्रक (क्रमांक जीजे १६ एव्ही ८५८३) लोखंड घेऊन अक्कलकुवा येथे येण्यासाठी निघाला. परंतु, मालट्रक चालक व वसीम अब्दुल रहिम मक्राणी (४०, रा. अक्कलकुवा) यांनी रस्त्यावरच तब्बल १३ लाख ३९ हजार १७१ रुपये किमतीचे लोखंड विकून दिल्याचा आरोप जैन यांनी फिर्यादीत केला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून वसीम मक्राणी व ट्रकचालक यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हा अन्वेशण शाखेचे निरीक्षक किरणकुमार खेडकर अधिक तपास करीत आहेत.