लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्यांनी एक लाख ९५ हजार रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना शहादा येथे नवीन भाजी मार्केट परिसरात घडली. याबाबत शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनुसार, कळमसर मोहिदा, ता.शहादा येथील रतिलाल सुदाम पाटील यांनी शहादा येथील युनियन बॅंकेच्या खात्यातून बुधवारी दुपारी एक लाख ९५ हजार रुपयांची रक्कम काढली. ती त्यांनी आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. त्यांच्यासोबत आलेले नारायण उत्तम पाटील यांच्या मोबाईलचा काच बदलण्यासाठी ते गेले तर रतिलाल पाटील हे दुचाकीजवळच थांबून राहिले. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या शर्टवर राख सदृष्य पदार्थ टाकला. त्यात त्यांना काही कळायचा आतच डिक्कीतून चोरट्याने एक लाख ९५ हजार रुपये चोरून नेले. डिक्कीला कुलूप लावलेले असतांना ही चोरी झाली कशी याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आल्यावर रतिलाल पाटील व नारायण पाटील यांनी शोधाशोध केली. परंतु उपयोग झाला नाही. याबाबत सायंकाळी उशीरापर्यंत शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरऱ्यामधील फुटेजच्या आधारे संशयीयातापर्यंत पोहचता येऊ शकते किंवा कसे याबाबत पोलिसांनी तपास करावा. अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनी देखील सजग राहावे असे बोलले जात आहे.
डिक्कीतून दोन लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2021 12:36 PM