शहादा : शहादामार्गे गुजरात राज्यात जाणारे तीन लाख रुपये किमतीचे आंब्याचे लाकूड शहादा वनविभागाच्या अधिकाºयांनी सारंगखेडा येथे जप्त केले. अकोल (खामगाव) येथून या लाकडाची अवैध वाहतूक करण्यात येत होती.याबाबत माहिती अशी की, अकोल येथून मालट्रकद्वारे (क्रमांक एम.एच.३० एल-३०७७) आंब्याच्या लाकडाच्या पाट्या व इतर लाकडाची सारंगखेडामार्गे गुजरात राज्यात जात होते. सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पगारे यांनी मालट्रकची तपासणी केली असता त्यांना लाकूड आढळून आले. पगारे यांनी शहाद्याचे वनक्षेत्रपाल अनिल पवार यांना भ्रमणध्वनीद्वारे याबाबत माहिती दिली. उपवनसंरक्षक एस.टी. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक पी.पी. सूर्यवंशी, अनिल पवार, वनपाल आर.पी. रुईकर, बोरुडे, व्ही.टी. पदमोर, वनरक्षक प्रवीण वाघ, युवराज भाबड, एन.बी. आखाडे, पी.एम. महाजन आदींनी सारंगखेडा येथे पोहोचून मालट्रकसह लाकूड ताब्यात घेऊन चालकाला अटक केली. या कारवाईत तीन लाख रुपये किमतीचे ५०० घनफूट आंब्याचे लाकूड व १२ लाख रुपये किमतीचा ट्रक असा सुमारे १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वाहन चालकाकडे लाकडाच्या कच्च्या पावत्या होत्या. (वार्ताहर)
सारंगखेड्याजवळ दोन लाख रुपयांचे लाकूड जप्त
By admin | Published: March 07, 2017 11:14 PM