नंदुरबार : दुचाकीचा धक्का लागल्याच्या वादातून मारहाण करणाऱ्यांना समजवित असताना दोघा पोलिसांना धक्काबुक्की करून शासकीय गणवेशाचे नुकसान केल्याची घटना नंदुरबारातील टापू परिसरात बुधवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनुसार, शहरातील टापू परिसरात मध्यरात्री इशान परदेशी याच्या दुचाकीचा धक्का लागल्याच्या वादातून पाच जण त्याला मारहाण करीत होते. मारहाण करीत परदेशी याच्याकडील १ लाख २८ हजारांची चेन काढून घेतली. त्यावेळी कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी इसमल कुसमल पावरा व अमोल जाधव तेथे गेले असता त्यांनाही जमावाने धक्काबुक्की करीत मारहाण केली. शासकीय गणवेशाचे नुकसान केले. त्यात जाधव यांच्या पायाला दुखापत झाली.
याबाबत पोलिस कर्मचारी इसमल पावरा यांनी फिर्याद दिल्याने गोविंद यशवंत सामुद्रे (३५), दीपक श्याम ठाकरे (३०), बॉबी ऊर्फ विश्वजीत संजय बैसाणे (२५), आकाश रवींद्र अहिरे (२८), विक्की बैसाणे (२४) सर्व रा. नंदुरबार यांच्याविरुद्ध शहर पोलिसात शासकीय कामात अडथळा व ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक सागर आहेर करीत आहे.