नंदुरबार/खेतिया : वेगवेगळ्या घटनेत दोन पोलिसांचा मृत्यू झाल्याची घटना नंदुरबार व खेतिया येथे घडली. खेतिया येथे अपघातात तर नंदुरबार येथे प्रकृती खालावल्याने पोलिसाचा मृत्यू झाला.पहिली घटना खेतियानजीक घडली. हवालदार प्रकाशसिंह खेडकर असे मयत पोलिसाचे नाव आहे. ते खेतिया पोलीस ठाण्यात कार्यरत होते. महाराष्टÑ-मध्यप्रदेश सिमेवरील आंतरराज्य चेक पोस्टवर त्यांची नियुक्ती होती.नेहमीप्रमाणे ड्युटी संपवून ते रात्री दहा वाजता आपल्या गावी अर्थात बडगाव, ता.पानसेमल येथे जात होते. खेतिया-सेंधवा रस्त्यावर खेतियापासून काही अंतरावर असलेल्या कॉटन फॅक्टरीसमोर त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या ट्रकने (क्रमांक एमएच १८ बीजी ४५९१) जबर धडक दिली. त्यात खेडकर यांना जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.खेतिया पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक लक्ष्मीनारायण मालवीय, उपनिरीक्षक अजमेरसिंह अलावा, नितीन अहिराव, हरिओम यादव करीत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.दुसरी घटना नंदुरबारात घडली. बाळू नारायण भोसले (५३) रा.जिजामाता नगर, नंदुरबार असे मयत पोलिसाचे नाव आहे. बाळू भोसले हे काही दिवसांपासून नंदुरबार जिल्हा कारागृहात नियुक्तीला होते. त्यांची अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले.याबाबत शहर पोलिसात नातेवाईकांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास जमादार ठाकरे करीत आहे.
नंदुरबार व खेतिया येथे वेगवेगळ्या घटनेत दोन पोलिसांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:16 PM