नंदुरबार : दोन वेगवेगळ्या घटनेत दोन महिलांचा डाकीणीच्या संशयातून छळ करून धमकी दिल्याची घटना धडगाव तालुक्यात घडली. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे धडगाव पोलिसात दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना गोरंबाचा खाट्यापाडा येथे घडली. ५५ वर्षीय महिलेस गावातील जमावाने तु डाकिण आहेस, स्वत:च्या मुलाला जादूटोणा करून मारून टाकल्याचा आरोप करीत तुला गावात राहू देणार नाही म्हणून शिविगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत महिलेच्या फिर्यादीवरून कामड्या मोत्या वळवी (३५), मनोहर काकड्या वळवी (३२), दारसिंग काकड्या वळवी (३८) यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना पानबारी येथे घडली. काल्या भरत वसावे यांच्या पत्नीचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता. आपल्या पत्नीवर गावातीलच ३९ वर्षीय महिलेने जादूटोणा केल्याने तिचा मृत्यू झाला म्हणून काल्या वसावे यांनी संशय घेतला. त्यावरून महिलेेस गावात राहू नये म्हणून सांगत शिविगाळ व ठार मारण्याची धमकी दिल्याने धडगाव पोलिसात जादूटोणा अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरिक्षक आय.एन.पठाण करीत आहे.