नंदुरबार : कोरोनामुळे प्रवासी वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. यातून सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणारी यंत्रणा मूळपदावर येत आहे. तर दुसरीकडे खासगी वाहतूक व्यवसाय पुन्हा तेजीत आला असून नंदुरबार शहरातून पुण्या-मुंबईकडे धावणारी ट्रॅव्हल्स हाऊसफुल्ल गर्दीत मार्गी लागत असल्याचे दिलासादायक दृश्य दिसून आले आहे.
एप्रिल २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने जिल्ह्याला ऐतिहासिक असे बदल पहावयाला मिळाले. यात रेल्वे व बसव्यवस्था पूर्णपणे बंद होऊन प्रवासी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली होती. कालांतराने खासगी व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरु झाल्यानंतर मार्च २०२१ पासून पुन्हा कोरोनाची दुसरी लाट फोफावत गेल्याने वाहतूक व्यवस्था बंद पडली होती. गत दीड वर्षांत दोन वेळा झालेले लाॅकडाऊन आणि कोरोनाची भीती यामुळे नागरिकांनी स्वत:च्या वाहनाने प्रवास करणे पसंत केले होते. यातून वर्षभर खच्चून गर्दी ओढणाऱ्या ट्रॅव्हल्स प्रथमच रिकाम्या धावू लागल्याचे दिसून आले होते. यातून गेल्या महिन्यात रक्षाबंधनाने ट्रॅव्हल्सला बूस्टर दिला होता. हाच बूस्टर कायम असून गणेशोत्सवाने ट्रॅव्हल्स चालक आणि मालकांना दिलासा मिळाला आहे. यातून बंद पडलेले व्यवसाय सुरळीतपणे सुरु झाल्याचे दिसून आले आहे. एकीकडे ही वाहतूक सुरळीतपणे सुरु झाली असताना, दुसरीकडे खासगी चारचाकी वाहनचालकांनाही गर्दी मिळू लागल्याचे दिसून आले आहे. यातून त्यांच्या रोजगारालाही गती मिळाली आहे.
नंदुरबार ते पुणे आणि मुंबई मार्गावर सर्वाधिक गाड्या सुटत आहेत. डिझेलची दरवाढ तसेच चालक आणि वाहकांचे वेतन वाढले आहे. यामुळे दरांमध्ये काहीअंशी दरवाढ आहे. इंधन दर कमी झाल्यास या दरांमध्येही कपात करण्याचे नियोजन आहे.
-तुकाराम चित्ते, ट्रॅव्हल्सचालक,
खासगी वाहने व मिनिबस भाडेही वाढले आहे. डिझेल रेट वाढल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. सध्या पर्यटनासाठी जाणारे उत्साह दाखवत आहेत. यामुळे मिनी बसच्या बुकिंग जोरात सुरू आहेत. यातून या व्यवसायावरील अवकळा दूर होत आहे.
-जितेंद्र सोनार, वाहतूक व्यावसायिक,
वर्दी......... मिळू लागली
एकीकडे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय गती पकडत असताना खासगी वाहन चालकांनाही प्रवासी मिळत आहेत. सध्या पर्यटनासाठी जाणारे प्रवासी मिळत असून येत्या काळात सणासुदीनिमित्त जिल्ह्यात येणारे व बाहेर जाणारे प्रवासी मिळून व्यवसाय सुरू राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुलांना गणेशोत्सवात घरी यायचे असल्याने ट्रॅव्हल्सचे बुकिंग गेले होते. सुटीमुळे त्यांना घरी येता आले. वाहतूक व्यवस्था सुरू झाल्याने होणारे हाल थांबले आहेत. ही महत्त्वपूर्ण बाब आहे.
-अविनाश पाटील, नंदुरबार.
भाडेवाढ झाली असली तरी पुण्याकडून येणाऱ्यांची अडचण दूर झाली आहे. सर्वच ठिकाणी जादा पैसे मोजावे लागत आहेत. परंतु प्रवास सुखकर आणि उपाययोजनांसह होणे गरजेचा आहे.
-शशिकांत पाटील, नंदुरबार.